Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 February, 2011

पणजी बाजार गाळे घोटाळा प्रकरणी आज चौकशी समितीची घोषणा

पणजी, दि. ३ (विशेष प्रतिनिधी)
पणजी महानगरपालिका बाजारातील दुकान आणि गाळे वाटप प्रकरणी आपण कोणालाही अभय देणार नाही, असे ठोस आश्‍वासन देत या प्रकरणी सभागृह समितीमार्फत किंवा स्वतंत्रपणे चौकशी करण्यास आपण राजी आहोत, अशी ग्वाही नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी दिली. दरम्यान, ज्योकीम आलेमाव यांनी नेमलेल्या सभागृह समितीला आक्षेप घेत तसेच या घोटाळ्याची निश्‍चित कालावधीत चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी लावून धरल्याने यासंबंधी उद्या ४ रोजी निर्णय घेण्याचे ठरले.
आज विधानसभेत आमदार दिलीप परुळेकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला असता त्यावर जोरदार चर्चा झाली. नगरविकासमंत्र्यांनी वेळोवेळी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्‍वासन देऊनही अद्याप काहीच कारवाई होत नसल्याचे पर्रीकर म्हणाले. या दुकान वाटपात घोटाळा झाल्याचे खुद्द नगरविकासमंत्र्यांनीच मान्य केले आहे व त्यामुळे या घोटाळ्यातील गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही पर्रीकर यांनी केली. दरम्यान, या संपूर्ण व्यवहाराच्या चौकशीला आपली मान्यता असल्याचे सांगून ही चौकशी स्वतंत्रपणे करावी की सभागृह समितीमार्फत करावी यावर सभागृहानेच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. ज्योकीम आलेमाव यांनी आपल्या अध्यक्षतेखाली सभागृह समितीची निवड केली असली तरी त्यासंबंधी सदस्यांना विश्‍वासात घेतले नाही, असा आक्षेप पर्रीकर यांनी घेतला. सभागृह समितीची रचना आपल्याला मान्य नाही, असे सांगून ही चौकशी ठरावीक वेळेत पूर्ण होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, उद्या ४ रोजी याप्रकरणी अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा सभापती प्रतापसिंग राणे यांनी केली.
मुळात या बाजार संकुलातील दुकाने विकूनही झाली आहेत. वेळीच चौकशी केली असती तर त्याला काही अर्थ होता; पण तरीही या प्रकरणाची खरोखरच गंभीरपणे चौकशी होत असेल तर पुरावे सादर करण्याची तयारी पर्रीकर यांनी दर्शवली.

No comments: