Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 30 January, 2011

म्हापसा जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण कराल तर रस्त्यावर उतरणार

म्हापशातील जाहीर सभेत दयानंद नार्वेकर गरजले
म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी): राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळ २१ वर्षांसाठी ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याचा घाट घातला असून तो कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही. या इस्पितळाच्या खाजगीकरणाचा निर्णय त्वरित बदलावा. अन्यथा जनतेबरोबर राहून आपणही रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा खणखणीत इशारा सत्तारुढ कॉंग्रेसचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी आज येथे दिला. जर हे इस्पितळ ताबडतोब सुरू केले नाही तर या सरकारच्या विरोधातच ‘एफआयआर’ दाखल केला जाईल, अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांच्या संपत्तीची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी जोरदार मागणी शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी यावेळी केली. विधानसभेत हा मुद्दा आपण लावून धरणार आहोत, असे त्यांनी बजावले..
येथील टॅक्सी स्टँडवर गोवा डेमोक्रॅटिक फ्रंटने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, स्थानिक नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा पणजीचे नगरसेवक अविनाश भोसले, नगरसेवक दीपक म्हाडेश्री, प्रेमानंद साळगावकर व अन्य नेते उपस्थित होते.
नार्वेकर म्हणाले, तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या इस्पितळाचा पाया रचला. आपण आरोग्यमंत्री असताना २००७ साली इस्पितळ पूर्ण झाले. याकामी आपणही योगदान दिले आहे. असे असताना राजकारणात आता कुठे प्रवेश केलेल्या आरोग्यमंत्र्यांना सदर इस्पितळाचे खाजगीकरण करण्याचा अधिकार कोणी दिला? या जिल्हा इस्पितळाचा कारभार कसा चालवायचा याचा निवाडा करण्याचा अधिकार म्हापसावासीयांनाच आहे. तो हक्क कोणीही काढून घेऊ शकत नाही. त्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न गोवा डेमोक्रॅटिक फ्रंटतर्फे केले जातील. हे इस्पितळ विकण्याचा सरकारचा मनसुबा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. आरोग्यमंत्री पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष होते तेव्हाही त्यांनी महामंडळाची विश्रांतीगृहे ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याचा सपाटा लावला होता.
सध्या या इस्पितळावर दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. २५ कोटींची यंत्रसामुग्री गंजत चालली आहे. हा सारा पैसा जनतेचा आहे. तो हवा तसा उधळण्याचा अधिकार सरकारला नाही, असेही नार्वेकर यांनी जनतेच्या निदर्शनाला आणून दिले.
गेली ३५ वर्षे मी राजकारणात आहे. मात्र माझ्यावर एकदाही छापा पडलेला नाही. बाकी कोणावर कसे छापे पडले व ती मंडळी केव्हापासून राजकारणात आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. मला मंत्रिपद दिले नाही म्हणून मी सरकारच्या विरोधात बोलतोय असे नव्हे. जरी मला मंत्रिपद देऊ केले तरी मी ते आता स्वीकारणार नाही. आतापर्यंत या सरकारने मला भरपूर डिवचले आहे. पण लक्षात ठेवा जोपर्यंत हळदोण्याचे मतदार माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत माझा पाडाव करणे कोणालाच शक्य होणार नाही, असे श्री. नार्वेकर यांनी निक्षून सांगितले.
दयानंद मांद्रेकर
जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी दिला. आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील प्रत्येक सरकारी प्रकल्पाचे खाजगीकरणाचे करण्याची सवयच आरोग्यमंत्र्यांना जडली आहे. त्यातून मिळणार्‍या पैशातूनच लोकांना विविध देवस्थानच्या यात्रा घडवून आणल्या जातात, असा आरोप मांद्रेकर यांनी केला. त्यामुळेच आरोग्यमंत्र्यांकडील संपत्तीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विधानसभेतही आपण हा मुद्दा अग्रक्रमाने लावून धरणार आहोत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत कांदोळकर यांनी केले. राजेश आमोणकर यांनी आभार मानले.
------------------------------------------------------------------
फुलून गेलेला जनसागर..
या जाहीर सभेला सुमारे तीन हजार लोक उपस्थित होते. जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाच्या विरोधात केल्या गेलेल्या प्रत्येक वक्तव्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे लोकांच्या भावना यासंदर्भात कशा तीव्र बनल्या आहेत हेच प्रकर्षाने दिसून आले.

No comments: