Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 31 January, 2011

कब्रस्तान प्रश्न सोडविणे फक्त भाजपलाच शक्य

-आमदार दामोदर नाईक यांची ग्वाही

मडगाव,दि.३० (प्रतिनिधी) :कब्रस्तानचा प्रश्न सोडविण्याची क्षमता कॉंग्रेसमध्ये नाही व त्याला तो सुटलेलाही नको आहे, यास्तव आपल्या आश्‍वासनाशी प्रामाणिक व ठाम रहाणार्‍या भाजपला सत्तेप्रत न्या व कब्रस्तानचा प्रश्न कायमचा सोडवा, असा प्रस्ताव फातोड्यार्र्चे आमदार व भाजप विधीमंडळ पक्षप्रवक्ते दामोदर नाईक यांनी आज येथे प्रमुख मुस्लिम नेते व कार्यकर्ते यांच्यासमोर ठेवला.
काही सरकारी सुट्ट्यंाबाबतचा अपवाद सोडला तर कार्यकाल पूर्ण न होताही पर्रीकर सरकारने दिलेली सारी आश्‍वासने पूर्ण केली ही महत्वाची व समाजांतील सर्व घटकांनी नोंद घेण्याची गोष्ट असल्याचे नाईक यांनी सांगितले. पर्रीकर सरकारने मुस्लिम शाळांसाठी भरघोस अनुदान दिले व त्यामुळेच त्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, ही वस्तुस्थिति कोणी नाकारू शकत नाहीत. कॉंग्रेसप्रमाणे लोकाना लाचार बनवून स्वतः सत्ता चाखायची ही भाजपची वृत्ती नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला स्वाभिमानाने जगण्याची सवय लावणे हाच भाजपचा कार्यक्रम आहे,असे ते म्हणाले.
भाजपबाबत वेगवेगळा अपप्रचार कॉंग्रेस व अन्य पक्ष करीत आलेले आहेत पण त्या अपप्रचाराला बिहारातील लोकांनी दाद न देता विकासाची कास धरली. ते अनुकरण गोव्याने केले तरच गोव्याला भवितव्य आहे असे सांगताना कॉंग्रेस राजवटीत बोकाळलेला अनिर्बंध खाणव्यवसाय, अमली द्रव्यांचा व्यापार, विविध खात्यांतील भ्रष्टाचार याकडे लक्ष वेधले व या सर्व गोष्टी निमूटपणे सहन करून याच लोकांना परत सत्तेप्रत नेले तर तुमचीच मुले तुम्हाला जाब विचारतील, असे बजावले.
यावेळी एका मुस्लिम नेत्याने आपण मुख्यमंत्र्याचा कट्टरसमर्थक असून यावेळी आपण त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी कब्रस्तानाचा मुद्दा सोडविला नाही तर तमाम मुस्लिम स्वतःचा उमेदवार उभा करतील वा भाजपला पाठिंबा देतील असे सांगितल्याचे स्पष्ट केले त्यावर कब्रस्तानचा मुद्दा दिल्लीपर्यंत नेणारे दुसरे एक मुस्लिम नेते म्हणाले की सरकारचा सोनसोडो येथील जागा देऊन टाकण्याचा डाव आहे, पण तेथील घाणीत आम्हाला कब्रस्तान नको, तेथे जरी फोमेंतो कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करणार असला तरी तेथील घाण दूर होणे कदापी शक्य नाही व अशा घाणीत कब्रस्तान करणे इस्लामला मान्य नाही.
त्यावर मुख्यमंत्रीसमथर्र्क नेत्याने सां जुजे आरियाल येथे मुस्लिमांनी खरेदी केलेली २२ हजार चौ. मी. जमीन असून तेथे स्वखर्चाने कब्रस्तान उभारण्याची त्यांची तयारी आहे. पण तेथील स्थानिक लोक त्याला विरोध करतात व सरकार त्यांची मनवळवणी करत नाही ही बाब निदर्शनास आणून दिली असता, त्याबाबत प्रयत्न करण्यासाठी सरकार संवेदनशील असावे लागते व कॉंग्रेस सरकारकडे त्याचीच उणीव आहे. त्यासाठी भाजपसारखा संवेदनशील पक्षच असणे आवश्यक आहे असे सांगून मनोहर पर्रीकरांच्या राजवटीत एकही मोर्चा रस्त्यावर आलेला नाही याचे उदाहरण दिले व सांगितले की त्यांच्यात समस्या समजून घेण्याची व त्या सोडविण्याची एक धमक होती. यास्तव कब्रस्तानचा प्रश्न सोडवावयाचा असेल वा ते आरियाल येथे उभे करावयाचे असेल तर भाजपला सत्तेप्रत न्या व निश्‍चिंत राहा, अशी ग्वाही त्यांनी दिली.

No comments: