Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 February, 2011

अमलीपदार्थ व्यवहाराबाबत गृहखात्याकडून दिशाभूल


आमदार तवडकरांचा हल्लाबोल


पणजी, दि. २ (विशेष प्रतिनिधी)
अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी कमी गुन्हे दाखल केले आहेत हे कसे, असा सवाल उपस्थित करून पैंगणीचे आमदार रमेश तवडकर यांनी सध्या वादाचे केंद्र बनलेल्या गृहखात्यावर आज हल्लाबोल केला. प्रश्‍नोत्तराच्या तासाला हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी गृहखात्याकडून मिळत असलेल्या चुकीच्या माहितीवर बोट ठेवले.
गोव्यात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा व्यवहार चालतो हे जगजाहीर असताना गुन्ह्यांची नोंद मात्र कमी कशी झाली, असा गृहमंत्र्यांना कोंडीत पकडणारा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे गृहमंत्री रवी नाईक यांनी, आता गोव्यात खूप कमी अमली पदार्थ आहेत हा या आकडेवारीचा संकेत नव्हे काय? हळूहळू अमली पदार्थांचे सगळे व्यवहार इथे बंद होतील आणि मग असे गुन्हे नोंद होणार नाहीत, असे हास्यास्पद उत्तर दिले.
गृहमंत्र्यांचे हे स्पष्टीकरण हे ऐकून विरोधक थक्कच झाले. मात्र तवडकरांनी आक्रमक भूमिका घेताना तुमचे पोलिस हे जनतेचे रक्षक नव्हेत तर भक्षक बनले असून कुंपणच इथे शेत खात असल्याचा टोला लगावला.
दरम्यान, गृहमंत्र्यांची उडवाउडवीची उत्तरे ऐकून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या चर्चेत भाग घेतला. गोव्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अमली पदार्थाच्या व्यवसायावर पांघरुण घालण्यासाठी गृहखाते व पोलिस सपशेल चुकीची माहिती सभागृहाला देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. अमली पदार्थासंबंधात राज्यपालांच्या अभिभाषणात दिलेली माहिती आणि गृहखात्याने विधानसभेत पुरविलेली माहिती यात विसंगती आहे, हे पर्रीकरांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
अभिभाषणात असलेल्या ड्रग्जसंबंधीच्या तक्रारी, अटक झालेल्यांची संख्या व गृहखात्याने दिलेला तपशील याचा ताळमेळ बसत नाही असे सांगतानाच, ‘कोण बरोबर आहे? राज्यपाल की गृहखाते?’ असा मार्मिक सवालही त्यांनी उपस्थित केला.

गुडलरप्रकरणी सीबीआय चौकशी
अमली पदार्थ विरोधी विभागाचे माजी पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर प्रकरणाची चौकशी गृहखात्याने सीबीआयकडे सोपविल्याची माहिती गृहमंत्री रवी नाईक यांनी आज सभागृहास दिली. पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी हा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला त्याला उद्देशून गृहमंत्री नाईक यांनी ही माहिती दिली.

No comments: