Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 February, 2011

‘बेकायदा कत्तलखाने त्वरित बंद करा’

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
राज्यात सुरू असलेले बेकायदा कत्तलखाने सरकारने एका महिन्यात बंद न केल्यास सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज अखिल विश्‍व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, विश्‍व हिंदू परिषद आणि पशू कल्याण सोसायटीने दिला आहे. त्याचप्रमाणे, या तस्करीला राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा वरदहस्त लाभला असल्याचा सनसनाटी आरोपही करण्यात आला.
आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब बोलत होते. याप्रसंगी त्यांच्याबरोबर विश्‍व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री राजू वेलिंगकर, पशुकल्याण सोसायटीच्या सचिव अँजेला काझी व लक्ष्मण जोशी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यात जागृती करून गोहत्येवर बंदी घालण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी राजू वेलिंगकर यांनी सांगितले.
काल मोले चेक नाक्यावर लाखो रुपये किमतीचे गोमांस आणि जनावरे पकडल्यानंतर मडगाव मतदारसंघातील काही गुंडांनी मुख्यमंत्री कामत आणि चर्चिल आलेमाव यांच्या नावे मोले पोलिस निरीक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप यावेळी श्री. परब यांनी केला. त्यामुळे या घटनेमागे या दोन्ही मंत्र्यांचा हात असल्याची टीकाही त्यांनी केली. एक बेडूक मारला तर ५०० रुपये दंड आणि जन्माला आल्यापासून वृद्ध होईपर्यंत आपल्या दुधातून माणसाने भरणपोषण करणारी गाय मारली तर ५ रुपये दंड, हा कायदा विसंगत असून तो बदलला पाहिजे आणि गाईंची हत्या करणार्‍यांना खुनाच्या कलमाखाली अटक करून फाशीची शिक्षा देणारा कायदा पारीत केला पाहिजे, अशी अशी जोरदार मागणी यावेळी श्री. परब यांनी केली. गोमांस आणि जनावरांच्या होणार्‍या तस्करीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारच्या पशुसंवर्धन संचालनालयाची आहे. परंतु या संचालनालयाचे अधिकारी कामचुकारपणा करतात. अशा अधिकार्‍यांवरही सरकारने कडक कारवाई करावी, असेही ते म्हणाले. काल उघडकीस आणलेल्या तस्करीच्या मुळापर्यंत जाऊन ही तस्करी करणार्‍या मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोव्यात बेकायदा गाई व बैलांची कत्तल होत असल्याचा प्रश्‍न घेऊन पशुसंवर्धन संचालनालयाचे संचालक सावीयो सिक्वेरा यांच्याकडे गेले असता यावर चर्चा करण्यास वेळ नसल्याचे सांगून त्यांनी आपली बोळवण केल्याची माहिती यावेळी पशुकल्याण सोसायटीच्या सचिव अँजेला काझी यांनी दिली. अनेक बेकायदा कत्तलखाने गावागावांत उभे राहिले आहेत. तस्करी करून आणलेले मांस हे दूषित झालेले असते. त्यामुळे ते गोव्यातील जनतेच्या आरोग्यासाठी घातक आहे, असे त्या म्हणाल्या.

बेकायदा कत्तलखान्यात लहान वारसांचीही कत्तल करून त्याचे मास बकर्‍याच्या मटणात मिसळून ते बाजारात विकले जाते, अशी खळबळजनक माहिती पशू कल्याण सोसायटीच्या सचिव अँजेला काझी यांनी दिली. अधिक नफा मिळवण्यासाठीच मटणात गाईच्या वासराचे मांस मिसळले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

No comments: