Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 February, 2011

कर्नाटकात मध्यावधी नाही : भाजप

हुबळी, दि. ५
कर्नाटकात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची शक्यता भाजपने आज फेटाळून लावली. आपल्या पक्षाचे सरकार या राज्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वासही भाजपने व्यक्त केला. कर्नाटकात मध्यावधीची अफवा ही विरोधी कॉंगे्रस, सेक्युलर जनता दलाने आणि राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी पसरविली आहे, असा आरोप करून, या राज्यांतील जनतेने भाजपला संपूर्ण पाच वर्षे सत्ता करण्यासाठी कौल दिला आहे. सरकारने आपली तीन वर्षे पूर्ण केली असून, आणखी दोन वर्षे आम्ही पूर्ण करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. एस. इंश्‍वराप्पा यांनी सांगितले.
.........

बिल गेटस यांनी केले
नितीशकुमारांचे कौतूक
पाटणा, दि. ५
बिहारची विकासाच्या मार्गावर ज्या गतीने वाटचाल सुरू आहे, ती पाहू जाता या राज्याला भविष्यात आपण आर्थिक मदत निश्‍चित करू, अशी ग्वाही देताना मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस् यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक केले. बिहारची विकासाकडे अतिशय झपाट्याने वाटचाल सुरू असल्याचे मला स्पष्टपणे दिसत आहे. विशेषत: आरोग्य क्षेत्रात या राज्याने चांगली प्रगती केली आहे, असे बिल गेटस् यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
...........

२-जी ः दिल्ली न्यायालयाची
सीबीआयला नोटीस

नवी दिल्ली, दि. ५
जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेत दावा केल्याप्रमाणे २-जी स्पेक्ट्रमचे परवाने वाटप झालेल्या काही कंपन्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे का हे स्पष्ट करावे, अशी नोटीस दिल्ली न्यायालयाने आज सीबीआयला बजावली आहे.
‘सीबीआयने आतापर्यंत केलेल्या या घोटाळ्याच्या तपासात कुठेही राष्ट्राच्या सुरक्षेला धोका असल्याचे निदर्शनास आले का यासंबंधी विस्तृत अहवाल सादर करा,’ असे विशेेष सीबीआय न्यायाधीश प्रदीप चढ्ढा यांनी सीबीआयला बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे. माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी मिळावी, यासाठी डॉ. स्वामी यांनी ही खाजगी तक्रार दाखल केली आहे. आता राजा यांना सीबीआयने अटक केली असल्याने याप्रकरणी न्यायालय पुढील कारवाई करावी का, असा प्रश्‍नही न्यायालयाने उपस्थित केला.
दरम्यान, २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यासह इतर काही जणांना सहआरोपी करण्यात यावे, अशी विनंती डॉ. स्वामी यांनी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला केली. याप्रकरणी साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आलेले नियंत्रक व महालेखापरीक्षक विनोय राय यांनी आपले वकील संदीप सेठी यांच्या माध्यमातून संपूर्ण अहवालाची एक अधिकृत प्रत न्यायालयात सादर केली.
..........

राज ठाकरेंना जामीन मंजूर

मुंबई, दि. ५
गेल्या वर्षी पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या तक्रारीसंदर्भात राज ठाकरे आज कल्याण न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर झाले होते. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर राज ठाकरे यांना पाच हजार रुपयांचा जाचमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर हा जामीन मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतरही डोंबिवलीत राहिल्याबद्दल राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांनी ३० ऑक्टोबरला एफआयआर दाखल केला होता.

No comments: