Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 February, 2011

‘पणजी फर्स्ट’ तेजीत, आघाडीत बिघाडी

महापालिका निवडणूक रणधुमाळी
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): ‘पणजी फर्स्ट’या नावाने भाजप समर्थक उमेदवारांचे पॅनल काल (दि.५) विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी एक भव्य कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर करून पणजी महापालिका निवडणूक बरीच रंगतदार होण्याचे संकेत दिले आहेत. कारण या पॅनलमध्ये पणजीच्या हितासाठी वावरणारे बरेच तरुण आहेत व त्यांना श्री. पर्रीकर यांनी पहिल्यांदाच संधी दिली आहे. तसेच या पॅनलचे नेतृत्व माजी महापौर अशोक नाईक करत आहेत ही पणजी फर्स्टसाठी जमेची बाजू आहे. उलट शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी घाईगडबडीत या पूर्वीच आपले ‘पणजी विकास आघाडी’ पॅनल जाहीर केले होते. मात्र सदर पॅनलमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच बिघाडी सुरू झाली असून पणजी महापालिका क्षेत्रातील लोकांचा रागरंग पाहून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नागेश करिशेट्टी व उदय मडकईकर या दोन वादग्रस्त वजनदार नगरसेवकांना वगळण्याची वेळ बाबूशवर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पॅनल जाहीर करतेवेळी भ्रष्टाचार सिद्ध झालेला नाही, त्यामुळे आपले नगरसेवक भ्रष्टाचारी आहेत असे मी मानत नाही! असे म्हणणार्‍या मंत्री बाबूशना मतदारांचा कल अल्पावधीतच ध्यानी आला व आपल्या ‘खंद्या’ नगरसेवकांना वगळावे लागले. काहींच्या मते बाबूश यांनी घाईगडबडीत पॅनल जाहीर करून शिताआधी मीठ खाण्याचा प्रकार केला तर अनेक राजकीय जाणकारांच्या मते बाबूश यांना आपल्या समर्थक मंडळाने गेल्या पाच वर्षात कोणताही विकास केला नाही यांची जाणीव होऊ लागल्यानेच वादग्रस्त नगरसेवकांना वगळून आपली पडती बाजू संभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे असे वाटत आहे.
अनेकांवर नजरा
पणजी महापालिका क्षेत्रात गेली अनेक वर्षे स्वकर्तृत्वावर निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, सत्ताधारी मंडळाचे नगरसेवक म्हणून काम केलेले मात्र बाबूशनी आपल्या पॅनलमध्ये स्थान न दिलेले राष्ट्रवादी पक्षाचे नेते नगरसेवक ऍड. अविनाश भोसले व पॅनलमध्ये स्थान देऊनही वादग्रस्त म्हणून वगळलेले एक वजनदार नेते असलेले उदय मडकईकर यांच्या भूमिका पणजी महापालिका निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असून त्यांचे पवित्रेा अजून स्पष्ट झालेले नाहीत. श्री. फुर्तादो हे आपल्या प्रभागावरच लक्ष केंद्रित करण्याची शक्यता असून ऍड. भोसले हे राष्ट्रवादीचे नेते आहेत व राष्ट्रवादीचे आमदार मिकी पाशेको यांनी पणजीत राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते.
मडकईकरांची भूमिका काय?
आपणास पॅनलमधून वगळू नये म्हणून सुमारे सहाशे समर्थकासह मंत्री बाबूश यांच्या बंगल्यावर मोर्चा नेऊनही काहीही साध्य न झाल्याने दुखावले गेलेले व एक धूर्त राजकारणी असलेले उदय मडकईकर पणजी महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. राजकीय जाणकारांच्या मते श्री. मडकईकर अपमानाने पेटून उठले तर बाबूश यांच्या पॅनलमधील बर्‍याच उमेदवारांचा पाडाव करण्यास ते कारणीभूत ठरू शकतात.
पणजी महापालिकेची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र या तारखेवर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी असून दोन्ही प्रमुख गटाचे पॅनल जाहीर झाल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र थोडेबहुत स्पष्ट झाले असले तरी वरील तीन वजनदार नगरसेवकांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पणजी महापालिका निवडणुकीचे एकूण चित्र स्पष्ट होईल हे मात्र नक्की.

No comments: