Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 February, 2011

भ्रष्टाचार ठेचल्यावरच विकास शक्य - डॉ.माशेलकर

कोसंबी विचार व्याख्यानमालेतील पहिले पुष्प

पणजी, दि. ५ (विशेष प्रतिनिधी)
देशाला १९४७ साली इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळाले, १९९१ साली आपल्या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली ते दुसरे स्वातंत्र्य मानता येईल तर २००८ साली अमेरिकेशी अणुसहकार्य करार करून तंत्रज्ञानविषयक भव्य भंडार या देशाला खुले करून दिले ते तिसरे स्वातंत्र्य होय. आता प्रतीक्षा आहे ती उपेक्षित आणि गरिबांना त्यांच्या सध्याच्या स्थितीतून वर काढण्याची. हे चौथे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही आजची गरज आहे. विकासानंतर भ्रष्टाचारमुक्ती नको, तर भ्रष्टाचारमुक्तीनंतरच विकासाला प्राधान्य द्या, असे आवाहन नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
‘अशक्य शक्य करण्यासाठी’ या विषयावर डी.डी. कोसंबी विचारमहोत्सवात शुभारंभी कला अकादमीत आज डॉ.माशेलकर यांनी पहिले पुष्प गुंफले. आपल्या विचारप्रवर्तक व्याख्यानात त्यांनी अनेक घटनांचा उल्लेख करीत, कोणतीही गोष्ट अशक्य न मानता, सारे कसे शक्य होऊ शकते, यावर विवेचन केले. आपण स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण कसे घेतले, हे सांगून प्राचार्य भावे आणि आपल्या आईचा उल्लेख करून ते म्हणाले, तिसरीपर्यंत शिकलेल्या आईच्या इच्छेने आणि कष्टाने आपण आजच्या स्थानावर पोचू शकलो. आपल्या अर्धशिक्षित आईने सर्वाधिक शिकावे असा हट्ट धरून मला उच्च शिक्षण घ्यायला लावले. अशक्यातून शक्य कसे आहे, त्याचे हे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. भारत देशाला तीन नोबेल पुरस्कार मिळू शकतात, हा देश जगात तिसर्‍या स्थानावर जाऊ शकतो अशा अनेक अशक्यप्राय गोष्टी घडून आल्या आहेत. देशातील सर्वांना पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सुखशांती देण्याचे प्रयत्न आत्तापर्यंत पूर्ण झाले नसले तरी हेही शक्य होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुढचे शतक भारताचेच असल्याचे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. त्याचबरोबर ‘आदर्श’ आणि ‘सत्यम’ या संकल्पनांचे संदर्भच सध्या बदलून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तैवान, कोरियासारखे देश तंत्रज्ञानात प्रगती करू शकले. आपण खुल्या मनाने व्यापक विचार केल्यास कोणत्याही क्षेत्रात आघाडी घेऊ शकतो. आर्थिक तरतूद किती आहे, यापेक्षा विचाराची व्यापकता किती आहे, याला महत्त्व द्यायला हवे. आत्मविश्‍वासाने सारे शक्य आहे. परदेशी गेलेले अनेक शास्त्रज्ञ पुन्हा भारतात परतत आहेत, असे सांगून मानवी शक्तीचे सामर्थ्य फार मोठे आहे, त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास काहीच अशक्य नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.
गोव्याबद्दल बोलताना ते म्हणाले, २०३५ पर्यंतची गोव्याची योजना तयार केली जात आहे. त्यात या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाची रुपरेषा असेल. विकास आणि पर्यावरण याचा योग्य मेळ घालून हे राज्य जगात सर्वात सुखी बनविण्याचे स्वप्न पाहा, असे सांगताना त्यांनी आर्थिक प्रगतीपेक्षा नैतिकता आणि निसर्गाचे रक्षण यावर अधिक भर द्या, त्यासाठी समतोल राखणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
व्याख्यानाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी प्रास्ताविक केले. कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या यशस्वी उपक्रमाबद्दल त्यांनी अभिनंदन केले. समुद्र संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सतीश शेट्ये यांनी डॉ. माशेलकर यांचा परिचय करून दिला. उपस्थितांमध्ये पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, रमाकांत खलप, आमदार फ्रांसिस डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेक्षकवर्गात युवकांचा अधिक भरणा होता.

No comments: