Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 February, 2011

मित्राला भेटण्यास आला अन् प्राण गमावून बसला

वास्को, दि. ५ (प्रतिनिधी)
मित्राला भेटून घरी जात असताना आगशी येथील सनी डीसा या १९ वर्षीय युवकाचा दुचाकीवरून ताबा सुटून त्याने महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडाला जबर धडक दिल्याने त्याचा ह्रदयद्रावक अंत झाला. त्यामुळे आगशी परिसरावर शोककळा पसरली आहे.
काल (दि. ४) रात्री अपघात घडल्यानंतर सदर युवक तेथील झुडपात एका तासाहून अधिक वेळ पडला होता. गस्तीवर असलेल्या वेर्णा पोलिसांना त्याचा मृतदेह दिसल्यावर पुढील सूत्रे हलली.
काल रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास सदर अपघात घडला. गावकरवाडा - भाटीम, आगशी येथे राहणारा सदर युवक साकवाळ येथे आपल्या मित्राला ‘बजाज प्लसर’ दुचाकीवरून (क्रः जीए ०७ डी ९७०२) भेटण्यासाठी आला होता. नंतर ११.१५ च्या सुमारास तो घरी जाण्यासाठी तेथून निघाला असता कुठ्ठाळी जंक्शनसमोर त्याचा वाहनावरील ताबा गेला. त्याने येथे असलेल्या झाडाला जबर धडक दिली. सनी हा तेथील झुडपात पडला, मात्र रात्र असल्याने याची जाणीव कोणालाच झाली नाही.
दीडच्या सुमारास वेर्णा पोलिस तेथून गस्तीसाठी निघाले असता त्यांना
तेथे अपघातग्रस्त दुचाकी दिसली आणि सनी झुडपात गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याला त्वरित झुडपातून बाहेर काढून नंतर १०८ रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलवण्यात आले. मात्र
रुग्णवाहिकेतील कर्मचार्‍यांनी तेथे जाऊन सनीची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
वेर्णा पोलिसांनी सनीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात मृतदेहाची चिकित्सा करण्यात आल्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत गावस पुढील तपास करीत आहेत.

No comments: