Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 June, 2010

हप्तेखोरांची चौकशी दक्षता खात्याकडून

वरिष्ठ पोलिसांची कोलांटी
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)- पेडणे पोलिस स्थानकातील हप्तेखोर पोलिसांची खात्याअंतर्गत चौकशी होईल, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून काल देण्यात आले, तोच आज अचानक याविषयावरून पोलिसांनी कोलांटी घेण्याचा अजब प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती नाही, कदाचित दक्षता खात्यामार्फत ही चौकशी सुरू असावी, अशी काहीशी संभ्रमित प्रतिक्रिया पोलिस खात्याचे जनसंपर्क अधिकारी तथा गुन्हा विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त करून सर्वांनाच पेचात टाकले आहे.
"हप्तेखोर पेडणे पोलिसांच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या "गोवादूत' च्या वृत्ताने आज संपूर्ण पोलिस खातेच दणाणून गेले. पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी हे आदेश जारी केल्याचे कालपर्यंत पोलिस सूत्रांकडून सांगितले जात होते. आज पोलिस खात्याचे अधिकृत जनसंपर्क अधिकारी आत्माराम देशपांडे यांनी मात्र ही चौकशी दक्षता खात्यातर्फे सुरू आहे, असे सांगून खात्यांंतर्गत चौकशीच्या वृत्ताला बगल देण्याचाच प्रकार घडला. पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये व दोन पोलिस शिपाई हे ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करीत असल्याच्या तक्रारी पोलिस खात्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पेडणे पोलिस हरमल येथील सनी नामक "खबऱ्या' च्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरूनही अडचणीत आले आहेत. ड्रग्स व्यवसायाशी संबंधित असलेल्या या व्यक्तीचा पूर्ण परिचय असूनही त्याच्या मृत्यूची नोंद अज्ञात व्यक्ती अशी करून पेडणे पोलिसांनी उघडपणे हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला, असाही आरोप आता होऊ लागला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असूनही या घटनेच्या चौकशीचे आदेश निघत नाहीत, यावरून वरिष्ठ पातळीवर समझोता करून यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशीही चर्चा सुरू आहे.
या प्रकाराबाबत वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्यासही तयारी दर्शवली नाही. रात्री ९ वाजता आत्माराम देशपांडे व पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. पोलिसांच्या हप्ते प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी होणेच शक्य नाही, अशी माहिती पोलिस खात्यातीलच काही गुप्त सूत्रांनी दिली. प्रत्येक पोलिस स्थानकावरील हप्त्यांचा वाटा हा वरिष्ठांपर्यंत पोहचत असतो व त्यामुळे त्याची चौकशी करण्याचा आदेश हाच मुळी एक विनोद आहे, असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पेडणे पोलिस स्थानकात केवळ ड्रग्स व्यावसायिकांकडूनच नव्हे तर पत्रादेवी चेकनाका, जुगार व वेश्याव्यवसायाचेही लाखो रुपयांचे हप्ते पोलिसांकडूनच गोळा केले जातात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. हरमल येथील सनी नामक या खबऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास पोलिस व ड्रग्स व्यावसायिकांच्या संबंधाचे आणखी एक रॅकेट उघडकीस येईल व त्यामुळेच हे प्रकरण पडद्याआड टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नादिया तोरादो मृत्यू प्रकरणामुळे पोलिसांना आपल्या ड्रग्स प्रकरणावरून प्रसारमाध्यमांचे लक्ष्य विचलित करण्याची आयतीच संधी प्राप्त झाल्याने पेडणे पोलिसांच्या या दोन्ही प्रकरणांवर पडदा टाकण्याचीच धडपड सुरू असल्याचीही खबर मिळाली आहे.

No comments: