Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 19 June, 2010

पोर्तुगीजांच्या खुणा समूळ नष्ट न केल्यास पुन्हा लढा

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमलींचा इशारा

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केलेल्या पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता मिळवण्यासाठी अनेकांनी हालअपेष्टा व अत्याचार सहन केले तर काही जणांनी आपल्या प्राणांचीही आहुती दिली. आज त्याच राज्यात पोर्तुगीज राजवटीचा उदोउदो केला जाणे ही अत्यंत शरमेची व दुर्दैवाची गोष्ट आहे. येत्या १९ डिसेंबर २०१० रोजी गोवा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असताना राज्यातील पोर्तुगीज राजवटीच्या जुन्या खुणा समूळ नष्ट न केल्यास पुन्हा एकदा नवा लढा सुरू करणे भाग पडेल, असा असा सज्जड इशारा गोवा दमण व दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी दिला.
आज गोवा क्रांतिदिनाच्या निमित्ताने येथील आझाद मैदानावर आयोजित राज्य पातळीवरील कार्यक्रमांत बोलताना श्री.करमली यांनी हा इशारा दिला. यावेळी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत, समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, राज्य प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी व अनेक नागरिक व विद्यार्थी हजर होते. एकीकडे राज्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाची आखणी सुरू असताना काही लोक पोर्तुगिजांनी गोवा सोडल्याची ५०० वर्षे साजरा करण्याच्या तयारीत आहेत. गोवा मुक्तीलढ्यात प्राणार्पण केलेल्यांची ही क्रूर चेष्टा थांबवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही श्री.करमली म्हणाले. राजधानीत अजूनही अनेक मार्गांना पोर्तुगिज साम्राज्यवाद्यांची नावे बहाल करण्यात आली आहेत.ज्या लोकांनी गोमंतकीयांवर निष्ठुर अत्याचार केले त्या लोकांची नावे मुक्त गोव्यात अशी मिरवली जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून येत्या १९ डिसेंबरपर्यंत ही नावे हटवण्यासाठी सरकार व पणजी महापालिकेने कृती केली नाही तर स्वातंत्र्यसैनिकांना पुन्हा एकदा गोवा मुक्ती लढा उभारावा लागणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणांत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुख्य मागणीलाच हात घातला.येत्या १९ डिसेंबर २०१० पूर्वी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल व गोवा सुवर्णमहोत्सवापूर्वी संघटनेची एकही मागणी प्रलंबित राहणार नाही, असे ठोस आश्वासन दिले. राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांनी गोवा मुक्ती लढ्याच्या गतस्मृतींना उजाळा दिला. देशबांधवांनी गोवेकरांच्या पाठीमागे ठाम राहून दिलेला लढा अजिबात विसरता कामा नये, असे सांगून महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील हुतात्म्यानांही आदरांजली वाहणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.
गोवा स्वातंत्र्यसैनिक संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत केंकरे यांनी आपल्या भाषणात कॅसिनो संस्कृती रुजवून गोव्याचे माकांव करू नका,असा सल्ला सरकारला दिला. मुख्यमंत्री कामत यांचे आम आदमीचे सरकार असेल तर विविध योजना या लोकांपर्यंत का पोहचत नाही, याचा शोध लावा,अशी सूचना त्यांनी दिली. वेळकाढू सरकारी प्रक्रियेमुळे सर्वसामान्य लोकांची दमछाक होते, त्यामुळे ही प्रक्रिया सुटसुटीत होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सुरुवातीला सर्व महनीय व्यक्तींनी हुतात्मा व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी मुख्यमंत्री व राज्यपालांच्याहस्ते शाल,श्रीफळ व हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह बहाल करून १४ स्वातंत्र्यसैनिकांचा हयात व मरणोत्तर सत्कार करण्यात आला. बाल भवनच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दयानंद राव यांनी केले.

No comments: