Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 June, 2010

'पंचवाडी खाण प्रकल्पाची आपणास माहितीच नाही'

मुख्यमंत्र्यांच्या अजब पवित्र्याने पंचवाडीवासीय चक्रावले
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी): पंचवाडीतील नियोजित खनिज प्रकल्पाबाबत आपल्याला कसलीच माहिती नाही, असा पवित्रा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतल्याने पंचवाडीवासीय आज अक्षरक्षः चक्रावूनच गेले. पंचवाडीतील नियोजित खनिज प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी पंचवाडी बचाव समितीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता कामत यांनी हे उद्गार काढले. पंचवाडीवासीयांना नको असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प गावात अजिबात होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिल्याने समितीने समाधान व्यक्त केले आहे.
पंचवाडी बचाव समितीतर्फे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेण्यात आली. समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्टा, नाझारेथ गुदिन्हो तसेच पंचवाडीचे धर्मगुरू फादर लॉरेन्स रॉड्रिगीस व शिरोड्याचे आमदार महादेव नाईक आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळातर्फे पहिल्यांदाच पंचवाडी गावात विजर खाजन येथे सेझा गोवा कंपनीच्या नियोजित खनिज प्रकल्पाचा विषय उपस्थित झाला. यावेळी कामत यांनी या प्रकल्पाबाबत पूर्णपणे अनभिज्ञता व्यक्त करून शिष्टमंडळालाच पेचात टाकले. खाण मंत्री असूनही या प्रकल्पाची माहिती कामत यांना नसावी ही गोष्ट न पटणारीच होती. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी या प्रकल्पाची थोडक्यात माहिती कामत यांना दिली. सेझा गोवा कंपनीच्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन व जैविक समृद्धीने संपन्न असलेला भाग नष्ट होणार आहे. खुद्द सरकारकडूनच सार्वजनिक हिताचे कारण पुढे करून या प्रकल्पासाठी भूसंपादन केल्याचीही गोष्ट त्यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर, स्थानिकांना नको असल्यास हा प्रकल्प अजिबात होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, या शिष्टमंडळात सामील झालेले व या आंदोलनामागे ठामपणे उभे राहिलेले पंचवाडीचे धर्मगुरू फादर लॉरेन्स रॉड्रिगीस यांनी मुख्यमंत्री कामत यांना पंचवाडी गावात भेट देऊन ही जागा पाहण्याची विनंती केली व कामत यांनी ती मान्य करून आपण पंचवाडीला भेट देण्याचे मान्य केले.
पंचवाडी हा गाव नैसर्गिक संपत्तीने नटला आहे. शेती व बागायती हा इथल्या भूमिपुत्रांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. या गावातील बहुतांश लोक हे अनुसूचित जमातीचे घटक असून इथली नैसर्गिक संपत्ती नष्ट झाल्यास या लोकांवर देशोधडीला लागण्याची वेळ ओढवेल, अशी माहिती आमदार महादेव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
काही राजकीय नेते व कंपनीचे अधिकारी गावातील लोकांना विविध आमिषे दाखवून त्यांच्यात फूट घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक लोकप्रतिनिधी या नात्याने सत्याची कास धरून पंचवाडी गावचे हित जपणे व या लोकांना या लढ्यात पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यामुळे आपला या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे आमदार नाईक म्हणाले.
पंचवाडी गावातील शेतकऱ्यांसाठी म्हैसाळ धरणाची निर्मिती करण्यात आली. असे असताना केवळ एका खाजगी खाण कंपनीच्या स्वार्थासाठी या गावचा बळी देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा क्रिस्टो डिकॉस्टा व नाझारेश गुदिन्हो यांनी दिला. पंचवाडीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, या नियोजित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट होणार असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प हानिकारक ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.

No comments: