Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 June, 2010

नगरगावातील महिलांची पुरवठा खात्यावर धडक

'एपीएल' कार्डधारकांना फक्त दीड किलो तांदूळ
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या "आम आदमी' च्या राजवटीत सामान्य जनता आता अन्नालाही मोताद झाली आहे. दारिद्र्‌यरेषेवरील रेशनकार्डधारकांना ("एपीएल' - अबाव पॉवर्टी लाईन) प्रति रेशनकार्ड दहा किलो तांदूळ देण्याची तरतूद असतानाही केवळ दीड किलो तांदूळ देऊन त्यांची परवड सुरू असल्याची लेखी तक्रार नगरगाव पंचायत क्षेत्रातील महिलांनी नागरी पुरवठा संचालकांकडे केली आहे.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील महिलांच्या एका शिष्टमंडळाने आज नागरी पुरवठा संचालक श्री. पिळर्णकर यांची भेट घेतली. नगरगाव पंचायतीत "एपीएल' कार्डधारकांना केवळ दीड किलो तांदूळ मिळतात. याप्रकरणी इथल्या स्वस्त धान्य दुकानदारांना जाब विचारला तर कोटा पोहोचला नाही, असे कारण सांगून लोकांना परत पाठवले जाते, अशी तक्रार या महिलांनी केली आहे. तेथील ग्रामस्थ "एपीएल' गटात जरी असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे दीड किलो तांदूळ हे त्यांना एका दिवसासाठीही पुरणारे नाहीत,अशी प्रतिक्रिया राजश्री राघोबा शेळापकर यांनी व्यक्त केली.
"एपीएल' कार्डधारकांना मिळणारा कोटा म्हणजे जणू जनतेची चेष्टाच ठरला आहे. त्याद्वारे कुटुंबाच्या जेवणाची गरज भागू शकत नाही. प्रति कार्डधारकांना १० किलो ऐवजी ३५ किलो तांदूळ प्रति महिना मिळायलाच हवा. हा तांदूळ ९ रुपये प्रतिकिलो ऐवजी किमान ६ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करावेत, असेही त्या म्हणाल्या.
हा प्रकार केवळ नगरगावच नव्हे तर संपूर्ण सत्तरी तालुक्यात चालतो.आपल्यावरील अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे धाडसच सत्तरीवासीय घालवून बसले आहेत. "एपीएल' कार्डधारकाला प्रतिमहिना १० किलो तांदूळ मिळणे हा त्यांचा हक्क आहे पण तो हिरावून घेतला जात आहे. नगरगाववासीयांनी उघडपणे या अन्यायाला वाचा फोडण्याचे धाडस केले. राज्यातील इतर भागातही अशाच प्रकारचा अन्याय सुरू असल्याने या लोकांनीही नगरगाववासीयांना पाठिंबा द्यावा व स्वतःला आम आदमीचे सरकार म्हणवून मिरवणाऱ्या या सरकारला जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजधानीत मोठमोठ्या कलाकारांबरोबर महोत्सव साजरे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठीही आपला थोडा वेळ खर्ची घालावा. महोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण करताना जनतेला कमी दरात अन्नधान्य देण्यासाठीही काही पैसे शिल्लक ठेवाल तर लोक दुवा देतील, असा टोलाही लोकांनी हाणला.

No comments: