Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 June, 2010

जिवंत वाहिन्या कोसळून मांद्रेत महिला मृत्युमुखी

वीज खात्याच्या बेपर्वाईचा कळस
पेडणे, दि. १५ (प्रतिनिधी): वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे जीर्णावस्थेतील दोन जिवंत वीजवाहिन्या कोसळून सावंतवाडा मांद्रे येथील सौ. सविता उर्फ प्रतीक्षा पांडुरंग सावंत (वय ३३) या विवाहितेला आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास
आपला जीव गमवावा लागला.
वीज खात्याच्या हलगर्जीपणाचा हा जणू कळसच ठरला आहे. गेल्या वर्षी गेल्या वर्षी मोरजी येथे याच प्रकारे जिवंत वीजवाहिन्या कोसळून पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर ही दुसरी गंभीर घटना घडली आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी घातलेल्या वीजवाहिन्या अत्यंत जुनाट झाल्या होत्या. ठिकठिकाणी त्या जोडण्यात आल्या आहेत.
सावंतवाडा येथील जीर्ण वीजवाहिन्या बदलाव्यात म्हणून कित्येक वर्षांपासून लोक मागणी करत आहेत; तथापि, आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. याच बेपर्वाईचाच बळी ठरल्या त्या सविता सावंत. लोकांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारींचे कागदसुद्धा असेच जीर्ण झाले आहेत.
तब्ब्ल पाच तासांनी मृतदेह हलवला
वीज खात्याच्या या भोंगळ कारभारामुळे खवळलेल्या नागरिकांनी जोपर्यंत मंत्री, वीज अभियंते यांनी येथे येऊन ठोस आश्वासन देईपर्यंत सविता यांचा मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतली. पहाटे ५.३० वा. सविता मरण पावली व तिचा मृतदेह सकाळी १० वाजता हलवण्यात आला. सविता ही पहाटे घराच्या बाजूलाच आपल्या दैनदिन कामासाठी पहाटे ५.३० वाजता गेली असता तेथे दोन जिवंत वीजवाहिन्या तुटून विहीरीच्या बाजूला पडल्या होत्या. त्याचा तिला स्पर्श झाला. एका वीज वाहिनीने तर तिच्या शरीरालाच विळखा घातला होता.
त्या धक्क्याने सविता एवढ्या मोठ्याने किंचाळली की, सारा वाडाच जागा झाला. तिचे पती पांडुंरग धावतच घटनास्थळी गेले आणि तिला पकडणार तेव्हा जवळच्या लोकांनी त्यांना खेचून त्वरित बाजूला नेले. अन्यथा भयंकर दुर्घटना घडली असती.
या घटनेची माहिती तातडीने पेडणे पोलिसांना देण्यात आली. मात्र ते दोन तासांनी तेथे पोहोचले. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांचा तर पत्ताच नव्हता. तब्बल तीन तासांनी वीज अभियंता श्री. शिरूर, म्हापशाचे अभियंते उल्हास केरकर घटनास्थळी हजर झाले. त्यापूर्वी संतप्त जमावाने श्री. म्हापसेकर या वीज हेल्परला मारहाण केली. एवढेच नव्हे तर तेथील संतप्त जमावाने वीज अभियंते व पोलिसांनाही फैलावर घेतले. वीज कर्मचारी मांद्रे विभागात ग्राहकांचा फोनही घेत नाही. ते स्कूटरने येतात व रस्त्यावरून वीजवाहिन्या बघतात. गाडीवरून उतरण्याची तसदीही घेत नाहीत. पूर्वीचे लाईनमन वेळेवर यायचे व काम करायचे. आता लाईनमनच नव्हे तर केवळ हेल्परच असतात अशी लोकांची तक्रार आहे.
संतप्त नागरिकांनी जोपर्यंत अभियंते ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही. किमान दहा लाख रुपये नुकसानी किंवा दोन लाख नुकसान भरपाई व तिच्या नवऱ्याला शासकीय नोकरीत सामावून घ्या अशा मागण्या केल्या. मात्र कोणत्याच मागणीवर अभियंत्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले नाही.
मिलिंद देसाईंना आणा
मांद्रे वीज विभागात मांद्रे येथील कर्तव्यदक्ष कनिष्ठ अभियंते मिलिंद देसाई यांना या भागात त्वरित आणा अशी मागणी लोकांनी केली आहे. तुटलेल्या वीजवाहिन्यांवर कोणतेही झाड किंवा फांदी पडली नव्हती. आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले की, वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे पूर्वी जनावरे मरायची. आता माणसे वीज वाहिन्याला स्पर्श होऊन मरू लागतात. तरीही वीजमंत्र्यांना जाग येत नाही. आपण या घटनेचा वीज खात्याच्या तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत. सदर कुटुंबाला कमाल शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
वीज अभियंता शिरूर यांनी सावंतवाडा मांद्रेे येथील ज्या जीर्ण वीजवाहिन्या तातडीने बदलण्याचे आश्वासन देताना आजपासून कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक दत्ताराम राऊत आपल्या फौजफाट्यासह हजर होते.
सरपंच महेश कोनाडकर, पंच राघोबा गावडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, देऊ सावंत, नामदेव सावंत, आबा सावंत आदींनी सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. पाच तासांनंतर मृतदेह बांबोळी येथे चिकित्सेसाठी पाठवण्यात आला.
-------------------------------------------------------
'आई आता कधीच परत येणार नाही'
एक मुलगा व एक मुलगी या दोन दोन छकुल्यांना पोरके करून सविता पांडुरंग सावंत देवाघरी गेल्या. "आता आपली आई कधीच परत येणार नाही,' हे या चिमुकल्यांना कोण सांगणार? त्यांच्या कुटुंबावर आणि या परिसरावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सावंतवाड्यात तर सविताचा असा हकनाक मृत्यू झाल्याचे वृत्त कानी पडताच अनेक महिलांनी हंबरडा फोडला.

No comments: