Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 February, 2010

मूकबधिर असल्याचे भासवून पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार

काणकोण भागांत लहानग्यांचा असाही वापर

काणकोण, दि. ६ (प्रतिनिधी)- काणकोण तालुक्यातील किनारी भागांत भिकाऱ्यांचा उच्छाद वाढल्याचे आमदार विजय पै खोत यांच्याकडून वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. भिकाऱ्यांच्या मागे पोलिस हात धुऊन लागतात हे हेरून आता या लोकांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. प्रत्यक्ष भीक न मागता मूकबधिर अनाथाश्रमाच्या नावाने आर्थिक मदत करण्याची पत्रके हातात घेऊन अत्यंत शिस्तबद्धरीत्या पर्यटकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे. १० ते १५ वयोगटातील परप्रांतीय मुलांचा याप्रकारासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याने पोलिस तथा संबंधित यंत्रणांनी तात्काळ या प्रकाराची दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
काणकोण भागांतील समुद्र किनाऱ्यांवर विदेशी पर्यटकांची वर्दळ अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही संधी साधून काही बिगरगोमंतकीय लोकांनी भीक व इतर भावनिक आवाहनाद्वारे लहान मुलांचा वापर करून पैसे उकळण्याचा एक नवा धंदाच उघडला आहे. आधीच किनाऱ्यांवर लमाणी व भिकाऱ्यांचा उच्छाद सुरू असताना आता हा नवा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला आहे.
१० ते १५ वयोगटातील अनेक मुले सध्या काणकोण भागातील समुद्र किनारे व बाजारपेठांत मूक बधिर असल्याचे सांगून पैसे मागताना दिसत आहेत. या मुलांच्या हातात मूकबधिर अनाथाश्रम विद्यालयाच्या नावाने काही पत्रके देण्यात आली आहेत. ती मुले आपण स्वतः मूकबधिर असल्याचे भासवतात. या आवाहनावर भारत सरकारच्या महिला कल्याण अनाथाश्रम, मूक, बधिर विद्यालय, बंगळूर असे लिहिण्यात आले आहे. या संस्थेचा प्रशासक या नात्याने के. एम. अँथोनी बंगळूर यांचा शिक्काही मारण्यात आला आहे. या आवाहनावर डॉ. जोझफ, एम. बी. बी. एस. थिरूविल्ला, पथानामथिता जिल्हा असा शिक्काही दिसून येतो.
गटागटाने फिरणारी ही मुले विदेशी पर्यटकांची पाठच सोडत नसल्याने त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते नको ती कटकट असा विचार करून या मुलांना पैसे देत असल्याची माहिती मिळाली आहे. काही पर्यटक तर भावनिकदृष्ट्या या मुलांकडे पाहून हेलावतात व पाचशे ते हजार रुपयांपर्यंतची मदतही त्यांना करतात, अशी माहिती एक प्रत्यक्षदर्शी सायबर सेंटरचे मालक विकास भगत यांनी "गोवादूत'ला दिली.
गोव्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात ही वेळ साधून काही परप्रांतीय ठेकेदार कर्नाटक व इतर राज्यांतून या मुलांना आणतात. सकाळी त्यांना काही महत्त्वाच्या ठिकाणी उतरवले जाते. संध्याकाळी एका ठरावीक जागेवरून त्यांना पुन्हा उचलले जाते व त्यांनी जमवलेली रक्कम गोळा केली जाते. काही काळापूर्वी बालहक्क आयोगाने काही मोजक्याच ठिकाणी छापे टाकून बालकामगारांवर कारवाई करून काही मुलांना ताब्यातही घेतले होते. बालहक्क आयोगाच्या पथकाने काणकोण किंवा राज्यातील अन्य कोणत्याही किनाऱ्यांवर एक टेहळणी केल्यास त्यांना अशा पद्धतीची अनेक मुले दिसतील, अशी माहितीही देण्यात आली.
अलीकडच्या काळात विशेष करून काणकोण परिसरात भिकारी व अशा पद्धतीने आर्थिक मदत मागण्याच्या बहाण्याने महिला व लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे व त्यांच्यावर सरकारी यंत्रणांचे अजिबात लक्ष नसल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकारावर आळा घालण्याची गरज आहे. या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अशा पद्धतीने भीक मागायला लावणाऱ्यांचा शोध घेणेही गरजेचे आहे. या प्रकरणी भीक किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती किंवा आरोग्याच्या विषयावरून आर्थिक मदतीसाठी आवाहन करणाऱ्या टोळ्याच राज्यात कार्यरत असल्याचा संशयही या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

No comments: