Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 February, 2010

बहुसंख्यांचा विरोध डावलून मोजक्यांकडूनच ठराव संमत

ग्रामसभेचा विरोध; मात्र ठराव संमत

पंचवाडीच्या "लिलावा'चा असाही डाव

पंचायत कार्यालयाची नासधूस
पंचवाडी - शिरोडा रस्ता रोखला
संतप्त ग्रामस्थांचा आज
गटविकास कार्यालयावर मोर्चा
गटविकास अधिकाऱ्यांशी आज चर्चा

सावर्डे व पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)- पंचवाडी गावात सेझा गोवा खाण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाला आज झालेल्या ग्रामसभेत बहुसंख्य ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला. मात्र या ग्रामसभेचे नेतृत्व करणारे उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी मात्र यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे काही मोजक्याच ग्रामस्थांना हाताशी धरून या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारा ठराव आवाजी मतदानाने घाईगडबडीत संमत करून घेतला व विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार या भीतीने प्रत्यक्ष घटनास्थळावरून पळ काढला.
शिरोडा मतदारसंघातील निसर्गसंपन्न अशा पंचवाडी गावावर सध्या खाण कंपनीची वक्रदृष्टी वळली आहे. सेझा गोवा खाण कंपनीला कोडली ते पंचवाडी असा खनिज रस्ता व विजर खाजन येथे बंदर प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारकडून सार्वजनिक हिताच्या नावाने भूसंपादनही करण्यात आले आहे. या प्रकल्पाला बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध असतानाही राज्य सरकारकडून या प्रकल्पाला अभय देण्यात येत आहे. आज या वादग्रस्त प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेला गावातील सुमारे सहाशेपेक्षा अधिक संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजता ग्रामसभा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुरुवातीला दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सह्या नोंदवहीवर घेण्यात आल्या व नंतरच ग्रामसभेला सुरुवात झाली. पंचायतीचे सचिव प्रदीप नाईक यांनी सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. या इतिवृत्तात अनेक ठरावांच्या बाबतीत चुकीची माहिती लिहिण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. आपली चूक मान्य करत त्यांनी या ठरावात दुरुस्ती करण्याचीही तयारी दर्शवली. यावेळी ग्रामस्थांनी दुरुस्ती केलेल्या ठरावांचे वाचन करूनच पुढील विषय हातात घेण्याची मागणी केली असता ती फेटाळण्यात आली.
यानंतर सेझा गोवा खाण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाचा विषय पुकारताच उपस्थित बहुसंख्य ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला. पंचवाडी गावात खाण व्यवसायाला अजिबात थारा देता कामा नये; एकदा हा प्रकल्प इथे उभा झाला की पंचवाडी गावचा नायनाट अटळ आहे, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या प्रकल्पाचे समर्थन करणे म्हणजे पंचवाडी गावाची विक्रीच करण्यासारखे आहे, त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उभा होऊ देणार नाही, असा निर्धार माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्ता व इतर ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामसभेतील बहुसंख्य ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचे पाहून या सभेचे नेतृत्व करणारे उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी हा ठराव आवाजी मतदानासाठी घालण्याचे जाहीर केले. मात्र विरोधकांनी या ठरावावर मतपत्रिकेद्वारे किंवा सह्यांद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आणि उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी आपल्या मर्जीनुसार हा ठराव ग्रामसभेसमोर ठेवला व या प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांनी हात उंचावावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांतील यापूर्वीच ठरवून हजर असलेल्या काही मोजक्याच लोकांनी उभे राहून जोरदारपणे या ठरावाला पाठिंबा दर्शवला व त्यानंतर उपसरपंचांनी विरोधकांना संधी न देताच ठराव संमत झाल्याचे जाहीर केले. यामुळे ग्रामसभेत एकच गदारोळ माजला. मात्र आपण केलेल्या कृतीचा काय परिणाम होणार आहे हे पुरते ठाऊक असलेल्या उपसरपंच आणि त्यांच्या मोजक्याच साथीदारांनी ग्रामस्थांना हुलकावणी देऊन मागील दरवाजातून पळ काढल्याचीही माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर पंचायत कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली. संगणक व पंचायत कार्यालयाच्या खिडक्यांची तावदानेही तोडण्याचा प्रकार घडला. या ठरावाला पाठिंबा देणाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप विरोधी ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर खोटा आळ आणण्यासाठीच हा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, पंचसदस्य केशव नाईक, लिना डिकॉस्ता व अरुण गांवकर यांनी पंचवाडी बचाव समितीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पंचवाडी - शिरोडा रस्ता रोखला व त्यामुळे वाहतुकीचा बराच गोंधळ निर्माण झाला. फोंड्याचे निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. यावेळी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्यासाठी अखेर फोंड्याचे गटविकास अधिकारी अरविंद खुटकर यांना पाचारण करण्यात आले. परंतु, त्यांच्या समजावण्यानंतरही खवळलेले ग्रामस्थ शांत होत नसल्याने अखेर आमदार महादेव नाईक यांना मध्यस्थी करावी लागली व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आपण ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको मागे घेण्यात आला.
गटविकास अधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या ८ रोजी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोर्चाच्या स्वरूपात जाण्यात येईल, अशी माहिती पंचवाडी बचाव समितीने दिली आहे. ग्रामसभेचा अवमान करणारे उपसरपंच व त्यांचे सहकारी पंचसदस्य यांना तात्काळ अपात्र करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
जॉन ब्रागांझा खाल्ल्या मिठाला जागले !
पंचवाडीच्या सरपंच विएना रॉड्रिगीस या सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत, त्यामुळे पंचायतीचा ताबा उपसरपंच लता नाईक यांच्याकडे होता. नियोजित खाण प्रकल्पावर खास ग्रामसभा बोलावण्यात आल्याने व या प्रकल्पाला गावात वाढता विरोध होत असल्याने अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले व जॉन ब्रागांझा यांची उपसरपंचपदी वर्णी लावण्यात आली. ग्रामसभा होण्यापूर्वीच जॉन ब्रागांझा यांच्याकडून या प्रकल्पाला पाठिंबा देणारा ठराव संमत करण्याचे आव्हान देण्याची भाषा केली जात होती. अखेर ते खाल्ल्या मिठाला जागले व ग्रामसभेत बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध असतानाही त्यांनी काही ठरावीक लोकांच्या मदतीने आवाजी मतदानाने ठराव संमत केला व ग्रामसभेतून पळ काढला. कंपनीच्या आमिषांना बळी पडून या विनाशकारी प्रकल्पाला पाठिंबा देणारे लोक अप्रत्यक्षरीत्या पंचवाडी गावाच्या विक्रीलाच मान्यता देत आहेत, त्यामुळे त्यांनी निदान आता तरी आपल्या कर्तव्याला जागून पंचवाडीचा बचाव करण्यासाठी आपला सहभाग द्यावा, असे आवाहन क्रिस्टो डिकॉस्ता यांनी केले आहे.

No comments: