Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 February, 2010

मित्रानेच दिली हल्ल्याची सुपारी!

- मुख्य सूत्रधारासह चौघांच्या
मुसक्या पोलिसांनी आवळल्या
- हल्लेखोरांची गॅंग कालापुरातील
- हल्ला झालेला पंच विनय फडते
याची प्रकृती चिंताजनक


पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - जुने गोवे पंचायतीचे पंच विनायक फडते यांच्यावर शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला करून फरारी झालेल्या तिघा हल्लेखोरांना चोवीस तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा हल्ला करण्यासाठी कालापूर येथील एका "गॅंग'ला सुपारी दिल्याची माहिती पुढे आली असून पोलिसांनी या हल्ल्याची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार राजेश कुशाली देसाई (३६ रा. जुने गोवे) याला अटक केली आहे.
सदर हल्ला अनेक कारणांसाठी झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासाअंतीच त्यावर संपूर्ण प्रकाश पडेल, असा दावाही पोलिसांनी केला. या प्रकरणी हल्लेखोर महावीर नदाफ (२२ रा. दोना पावला), नेत्रासिंग (मुळचा आसामी) व यान जॉन (मुळचा रा. नागालॅंड) यांना भारतीय दंड संहितेच्या ३०७ आणि १२० (ब) कलमांनुसार अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनायक फडते याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे "गोमेकॉ'तील सूत्रांनी सांगितले. विनायक याच्यावर परवा रात्री त्याच्याच घराच्या शेजारी दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी तलवार आणि सळ्यांनी वार करून गंभीर जखमी केले होते. यात त्याच्या डोक्यावर आणि हाताला गंभीर जखम झाली होती. उपचारासाठी रक्तबंबाळ स्थितीत त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले असता चेंदामेंदा झालेला त्याचा हात शस्त्रक्रिया करून कापावा लागला होता.
जुन्या मित्रानेच दिली सुपारी...
या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार राजेश देसाई हा विनायक राहात असलेल्याच इमारतीत वरच्या फ्लॅटमध्ये राहत असून दोघांचीही गेल्या काही वर्षांपासून चांगली मैत्री होती. त्यामुळे अनेकदा राजेश याची विनायक फडते याच्या घरात ये-जा असायची. मात्र काही महिन्यांपूर्वी कौटुंबीक समस्या निर्माण झाल्याने त्यांच्यात तेढ निर्माण झाली होती. त्याचे पर्यवसान परस्परांनी एकमेकाच्या व्यवसायात अडथळे निर्माण करण्यात झाले होते. त्यामुळे विनायकचा काटा काढण्यासाठी कालापूर येथील एका "गॅंग'ला सुपारी देण्यात आली. ही सुपारी एका लाखाची होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पूर्वनियोजित हल्ला...
कालापूर येथील या "गॅंग'च्या प्रमुखाने विनायकचा काटा काढण्याची जबाबदारी दोना पावला येथील "एनआयओ'च्या क्वाटर्समध्ये राहणाऱ्या महावीर नदाफ याला दिली होती. त्याने अन्य दोन साथीदार आपल्या बरोबर घेऊन विनायक याच्यावर पूर्वनियोजित हल्ला चढवला. त्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून दुचाकी उपलब्ध केली तर, या गॅंगच्या प्रमुखाने त्यांना तलवार आणि सळया पुरवल्यात, अशी माहिती अटक केलेल्या दोघा संशयितांकडून पोलिसांना मिळाली आहे.
खून प्रकरणात जामिनावर असलेल्यानेच केली दुसरी गेम...
महावीर नदाफ आणि सुपारी घेतलेल्या गॅंगचा प्रमुख हे दोघे शिरदोण येथील दुहेरी खून प्रकरणात जामिनावर असून कायदा धाब्यावर बसवून त्यांनी दुसरा खुनी हल्ला चढवला आहे. त्यामुळे खून प्रकरणातील संशयितांची जामिनावर सुटका करायची की नाही, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चिंबल, कालापूर बनतोय
सुपारी घेणाऱ्यांचा गड..
चिंबल व कालापूर या दोन्ही भागांत सुपारी घेऊन काटा काढणाऱ्या टोळ्या उदयास येत असून याची माहिती राज्य प्रशासनाला आणि पोलिस खात्याला असूनही कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकवेळा या भागात "कॉबिंग ऑपरेशन' करून अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची पोलिसांतर्फे तयारी केली जाते; परंतु, एनवेळी ही कारवाई स्थगित ठेवली जाते.
गेल्या काही वर्षात राज्यात झालेल्या अनेक खून, दरोडे आणि खंडणी प्रकरणात याच भागातील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
आगशी पोलिसांची कारवाई...
प्राणघातक हल्ला होताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी सर्वत्र संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात आगशीचे पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या पथकास संशयितांना त्याच रात्री ताब्यात घेण्यात यश आले. हल्लेखोर महावीर नदाफ याला पणजी शहरातून ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक कर्पे याच्या पथकात पोलिस शिपाई दत्ता वेर्णेकर, विनय श्रीवास्तव, अशोक मेगरी व समीर फडते यांचा समावेश होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. याविषयीचा पुढील तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर करीत आहेत.

No comments: