Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 February, 2010

...तर पंचवाडीत रक्ताचे पाट वाहतील!

खाण प्रकल्पाविरोधात पंचवाडीवासीयांचा मोर्चा
- उपसरपंचांना अपात्र ठरवा
- सचिवांवर कारवाई करा
- वादग्रस्त ठराव रद्द करा


फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) - बहुसंख्य पंचवाडीवासीयांच्या मागणीची अवहेलना करून व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता आणि विजर खाजन बंदर प्रकल्पाला पंचायतीने मान्यता दिली तर पंचवाडीच्या अस्तित्वासाठी जीवही पणाला लावण्यास आम्ही मागे राहणार नाही. हे सरकार जनतेची कदर करीत असेल तर त्यांनी तात्काळ हा प्रकल्प रद्द करावा; अन्यथा पंचवाडीत रक्ताचे पाट वाहतील, असा गर्भीत इशारा पंचवाडी बचाव समितीने दिला आहे.
पंचवाडी ग्रामपंचायतीच्या रविवार ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घिसाडघाईत संमत झालेल्या खाणसमर्थन ठरावाच्या निषेधार्थ पंचवाडी बचाव समितीने आज (दि.८) दुपारी तिस्क फोंडा येथील गटविकास कार्यालयावर मोर्चा आणला. पंचवाडीचे प्रभारी सरपंच जॉन ब्रागांझा यांनी एकतर्फीपणे घेतलेला हा ठराव त्वरित रद्द करावा,अशी मागणी समितीने केली. पंचायत सचिव प्रदीप नाईक यांचाही या कटात सहभाग आहे, त्यामुळे त्यांचीही बदली करावी, अशी मागणी समितीने गटविकास अधिकारी अरविंद खुटकर यांच्याकडे निवेदन सादर करून केली. याप्रसंगी शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी समितीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच त्यांनी पंचवाडीवासीयांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
पंचवाडीच्या पंच लीना डिकॉस्टा, पंच केशव नाईक, पंच अरुण गावकर, माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्टा आदी अनेकजण या मोर्चात सहभागी झाले होते. रविवार ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेचे इतिवृत्त अपूर्णावस्थेत आहे. पंचायत सचिवांनी ग्रामसभेचे इतिवृत्त मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत गट विकास कार्यालयाला सादर करावे, अशी तोंडी सूचना गटविकास अधिकारी श्री. खुटकर यांनी पंचायत सचिवांना ग्रामस्थांसमोर केली. उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी यापूर्वीच हा ठराव सेझा गोवा खाण कंपनीच्या समर्थनार्थ घेण्यात येईल,अशी दर्पोक्ती केली होती. ग्रामसभेचा विरोध असतानाही एकतर्फीपणे त्यांनी घेतलेल्या ठरावाचे पुरावेच ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यापुढे सादर केले. गटविकास कार्यालयातर्फे पाठवण्यात आलेल्या ग्रामसभा निरीक्षकांचा अहवाल आणि ग्रामस्थांनी सादर केलेले पुरावे यात बरेच साम्य असल्याचेही यावेळी श्री.खुटकर यांनी मान्य केले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या समक्ष ग्रामस्थांनी उपस्थित पंचायत सचिवांवर प्रश्नांचा भडिमार केला. ग्रामसभेला पोलिस संरक्षण असताना ठरावाचे दस्तऐवज घेऊन ग्रामसभेतून पळ का काढला, असा थेट सवाल करून ग्रामस्थांनी सचिवांना चांगलेच फैलावर घेतले. वादग्रस्त ठराव समंत करून उपसरपंच श्री. ब्रागांझा व पंचायत सचिवांनी पंचायत कार्यालयातून पलायन केले यावरून त्यांनी आपला स्वार्थी हेतू स्पष्ट केला,असा ठपकाही ग्रामस्थांनी ठेवला. आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी पंचवाडी गावचा लिलावच करण्याचा हा प्रकार असल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे केली. पंचवाडी ग्रामसभेत उपसरंपच व सचिवांनी लोकशाहीचा गळा कसा घोटला याचीही सखोल चौकशी व्हावी,असे निवेदनही ग्रामस्थांनी सादर केले.
आमदार महादेव नाईक यांनी सरकारने लोकांच्या भावनेशी खेळू नये असा इशारा देत या कटात पंचायत सचिव सहभागी असल्याने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. शिरोडा मतदारसंघातील चारही पंचायतींचे सचिव हे सध्या येथीलच एका राजकीय नेत्याच्या हातातले बाहुले बनलेले आहेत,अशी टीका केली. काही निवडक लोकांची कामे तात्काळ केली जातात तर उर्वरीत लोकांना विविध कामासाठी आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावतात, अशी तक्रारही त्यांनी केली.
पंचवाडीचा गळा घोटणाऱ्या सेझा कंपनीच्या खनिज प्रकल्पाला कदापि मान्यता दिली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पंच सदस्य लीना डिकॉस्टा यांनी दिला. सेझाचा प्रकल्प नको अशा आशयाचा एक ठराव ग्रामस्थांनी यापूर्वीच संमत केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.
यावेळी मोर्चेकरी ग्रामस्थांनी "आमची शेतां आमका जाय', "पंचायत सचिवाची हकालपट्टी करा', "सेझाचा खाण प्रकल्प हद्दपार करा' अशा घोषणा दिल्या.
तिस्क फोंडा येथील आगियार मैदानावरून मोर्चाला प्रारंभ झाला. येथील सरकारी इमारतीजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर ग्रामस्थांच्या प्रतिनिधीशी गटविकास अधिकारी श्री. खुटकर यांनी चर्चा केली.
बस चालकाला धमकी
पंचवाडी येथील खाण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना फोंड्याला मोर्चासाठी घेऊन आलेल्या खासगी बसच्या चालकाला अज्ञात व्यक्तीने चालकाच्या मोबाईलवर फोन करून जीवे मारण्याची, बसची नासधूस करण्याची आणि बसला आग लावण्याची धमकी दिली आहे. यासंबंधी बसचालक अल्लाउद्दीन शेख यांनी फोंडा पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. फोंड्यात आलेल्या ग्रामस्थांना पंचवाडी येथे घेऊन जात असताना हा फोन आला. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी, धमकी देणाऱ्याला त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

No comments: