Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 February, 2010

ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर पंचवाडी शिरोड्यात तणाव

खाण प्रकल्पास आज कडाडून विरोध

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पंचवाडी गाव "सेझा गोवा' खाण कंपनीच्या घशात घालण्यासाठी पुढे सरसावलेल्या राज्य सरकारला इंगा दाखवण्याची जय्यत तयारी येथील ग्रामस्थांनी केली आहे. उद्या ७ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सर्व शक्तीनिशी या नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाला विरोध करून त्याविरोधात ठराव समंत करून घेण्यासाठी पंचवाडीवासीय आक्रमक बनल्याने ही ग्रामसभा वादळी ठरणार यात शंका उरलेली नाही.
शिरोडा मतदारसंघ हा आतापर्यंत खाणमुक्त म्हणून परिचित होता, पण खनिज वाहतुकीसाठी बगल रस्ता तयार करण्याचे निमित्त साधून या मतदारसंघातील पंचवाडी गावात सेझा गोवा खाण कंपनीला बंदर उभारण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक हिताचे कारण पुढे करून भूसंपादनाची अनुमती दिल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. एका खाजगी खाण कंपनीला आपल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी कोडली ते पंचवाडी असा खनिज वाहतूक रस्ता व विजर खाजन येथे खनिज हाताळणी बंदर उभारण्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी पंचवाडीवासीयांनी कंबरच कसली आहे. उद्या ७ रोजी याविषयावर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या ग्रामसभेला संपूर्ण पंचवाडी गावच लोटण्याची शक्यता असल्याने ग्रामसभा खुल्या जागेत घेण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे.
दरम्यान, पंचवाडी बचाव समितीने ग्रामसभेसाठी सुरक्षेच्या कारणावरून पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निवेदन पोलिस उपमहासंचालक तथा फोडा पोलिस स्थानकाला दिले आहे. या ग्रामसभेला पोलिस संरक्षण पाठवण्यात येऊ नये यासाठीही काही लोक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
पंचवाडीच्या सरपंच व्हिएना रॉड्रिगीस या प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर आहेत. उपसरपंच लता नाईक यांना ग्रामसभा हाताळणे शक्य होणार नाही, यासाठी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून जॉन ब्रागांझा यांची उपसरपंचपदावर वर्णी लावण्यात आली आहे. उद्याची ग्रामसभा जॉन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नियोजित प्रकल्पावर ग्रामसभेचा निर्णय व्हायचाच आहे, पण त्यापूर्वीच जॉन ब्रागांझा यांच्याकडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात येणार असल्याची भाषा सुरू झाल्याने पंचवाडीतील ग्रामस्थ अधिकच डिवचले गेले आहेत. कंपनीकडूनही गावातील काही लोकांना व्यवसाय व रोजगाराची आमिषे दाखवून या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी फूस लावली जात असल्याचा आरोपही होत आहे. काही बड्या राजकीय नेत्यांकडूनही या प्रकल्पाचे समर्थन होत असल्याने या सर्व शक्तींना योग्य तो धडा उद्याच्या ग्रामसभेत घडवण्याचा चंगच पंचवाडीतील तिखट स्वाभिमानी ग्रामस्थांनी बांधला आहे.
पंचवाडीच्या सेंट ऍथनी चर्चच्या फादरांनी पंचवाडी बचाव समितीला आपला पूर्ण पाठिंबा दिला आहेच. शिवाय श्री देवी सातेरी देवस्थान समितीनेही या लढ्याला सहकार्य दिल्याने या प्रकल्पाच्या विरोधकांची ताकद अधिकच वाढली आहे.
दरम्यान,सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोडली ते पंचवाडी खनिज रस्त्यासाठी ५ लाख ५४ हजार चौरसमीटर जागा संपादन करण्याचे ठरवले होते. तथापि, भूसंपादनाच्या आदेशाप्रमाणे केवळ ३ लाख ९३ हजार ३११ चौरसमीटर जागा संपादन केली आहे. कोडली,म्हैसाळ व कामरकोंड येथील जागा संपादन करण्यात आली नाही, त्यामुळे सरकारच्या हेतूबाबतच आता संशय व्यक्त होऊ लागला आहे. एकदा का पंचवाडीत खनिज व्यवसायाला प्रवेश मिळाला की पुढे या गावाला धूळ प्रदूषण व बेदरकार खनिज वाहतुकीपासून कुणीही वाचवू शकणार नाही,अशी माहिती समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता यांनी दिली. राज्यातील खनिजग्रस्त भागातील लोकांनाही कंपनीने रोजगार व व्यवसाय दिला आहे; पण त्या भागातील लोकांची काय परिस्थिती झाली आहे याचा विचार करा,असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
निसर्गसंपन्न व शेतीप्रधान पंचवाडीसाठी खास म्हैसाळ धरणाची निर्मिती करण्यात आली व त्याव्दारे सुमारे २०० एकर जागा ओलित क्षेत्राखाली आणण्यात आली. आता खनिज प्रकल्पाला इथे आणून सरकार नेमके काय करू पाहत आहे, असेही ते म्हणाले.
प्राण गेला तरी बेहत्तर..
पंचवाडी बचाव समितीचे निमंत्रक माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्ता व नाझारेथ गुदिन्हो आदींना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या ७ रोजीच्या ग्रामसभेत या प्रकल्पाला विरोध केल्यास हात, पाय मोडून टाकू,असे त्यांना धमकावले जात आहे. ग्रामसभेत पंचवाडीवासीय सामील होऊ नयेत यासाठी दहशत निर्माण केली जात असल्याचीही खबर आहे. दरम्यान, या धमक्यांना अजिबात भीक घालीत नाही, असा निर्धार करून पंचवाडीसाठी प्रसंगी जीवाची बाजी लावण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही,असा ठाम निर्धार क्रिस्टो डिकॉस्ता यांनी व्यक्त केला. गाव वाचला तरच आपले अस्तित्व टिकणार याची जाणीव प्रत्येक ग्रामस्थाने ठेवावी व हा लढा यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामसभेत या प्रकल्पाविरोधात ठराव संमत केल्यानंतरच धमक्यांना प्रत्युत्तर देऊ,असा इशाराही त्यांनी दिला.

No comments: