Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 February, 2010

मुंबईच्या डबेवाल्यांची कीर्ती सातामुद्रपार..

बंगलोर, दि. २ - कोणालाही खूष करण्याचा मार्ग पोटातून जातो, असे म्हटले जाते. मुंबईतील डबेवाले तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या "नेटवर्क'ने आता अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूललादेखील भुरळ पाडली असून त्यामुळे या डबा संस्कृतीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.
रोज हे पाच हजार डबेवाले मुंबानगरीत तब्बल दोन लाख जेवणाच्या डब्यांचे वितरण कसे करतात, त्यांच्याकडून डबे देताना आणि जमा करताना एकही चूक कशी होत नाही, मुंबईसारख्या इतक्या दाट लोकवस्तीच्या महानगरात या मंडळींनी हा चमत्कार वर्षानुवर्षे कसा करून दाखवला, याचे कौतुकमिश्रित कोडे हार्वर्ड स्कूलमधील तज्ज्ञांनाही सुटलेले नाही. त्यांनी या डबेवाल्यांवर खास अहवाल तयार केला असून त्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. पुढील आठवड्यात मुंबईच्या डबेवाल्यांकडून त्यास मूर्त स्वरूप दिले जाईल आणि येत्या मार्चमध्ये हा अहवाल हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यासासाठी उपलब्ध केला जाणार आहे. सध्या बंगलोर भेटीवर असलेल्या मनिष त्रिपाठी या डबेवाल्याने ही माहिती पत्रकारांना दिली.
त्याचे असे झाले की, नऊ महिन्यांपूर्वी बोस्टनहून हार्वर्डचे एक प्राध्यापक खास या मोहिमेवरच मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर तेथील आणखी दोघे प्राध्यापकांचे विशेष संशोधनासाठी वरळीतील संशोधन केंद्रात आगमन झाले. या तिघांनी मिळून हा सर्वंकष अहवाल तयार केला आहे. या कालावधीत हार्वर्डच्या सदर तिन्ही प्राध्यापकांनी डबेवाल्यांबरोबर मुंबईभर पायपिट केली. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या आणि या डबे संस्कृतीतील बारकावे जाणून घेतले. मानवी बळाचा खुबीने वापर करून ही एवढी मोठी कामगिरी एकही चूक किंवा त्रुटी न राहता बिनबोभाट पार पाडली जाते हे पाहून बोस्टनचे तिन्ही सॅम अंकल चाटच पडले. त्यांचा पंचवीस पानांचा अहवाल याच सूत्राभोवती गुंफला गेला आहे. यातील कौतुकाचा पुढील टप्पा म्हणजे हार्वर्डने या अहवालाची जगभरातील विविध संस्थांना विक्री करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेतील अनेक औषध कंपन्यांनी भारतीय आयुर्वेदाचा तपशीलवार अभ्यास करून उच्च दर्जाची औषधनिर्मिती केली आहे. त्यातून ते कोट्यवधी डॉलर्स कमावत आहेत. आता हार्वर्ड स्कूलवाल्यांनी या डबेवाल्यांच्या कार्यसंस्कृतीतून डॉलर्स जमा करायचे ठरवले आहे. दुर्दैवाची बाब अशी की, आपल्या महाकाय देशातील एकाही बिझनेस स्कूलला यासारखे "जरा हटके' विषय घेऊन त्यावर संशोधन करावे, असे वाटले नाही. यालाच म्हणतात पिकते तिथे विकत नाही! अर्थात, मुंबईच्या या डबेवाल्यांची कीर्ती यानिमित्ताने सातासमुद्रापार पोहोचली हे काय कमी झाले..

चार्ल्सकडूनही कौतुकाचा वर्षाव
मध्यंतरी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी जेव्हा मुंबईला भेट दिली तेव्हा तेथील अनोखी डबा संस्कृती पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर जेव्हा कॅमेला पार्कर बोल्स यांच्याशी चार्ल्स यांचे शुभमंगल पक्के झाले तेव्हा त्यांनी या डबेवाल्यांना खास आमंत्रण दिले होते. डबेवाल्यांनीदेखील त्यांच्या या प्रेमळ विनंतीला मान देऊन त्यांना मराठमोळी भेट पाठवून दिली होती हे वाचकांना आठवत असेलच..
सध्या फक्त मुंबईच
बंगलोरच नव्हे तर तूर्त देशातील अन्य कोणत्याही अन्य शहरात आम्ही जेवणाचे डबे पुरवू शकत नाही. कारण तेथे मुंबईसारखी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. मुंबईतील गल्लोबोळसुद्धा आम्हाला आता पाठ झाले आहेत. बंगलोरमधील भौगोलिक रचना डबेवाल्यांच्या अंगवळणी पडण्यासाठी बराच काळ जावा लागेल, असेही मनिष त्रिपाठी याने सांगितले.

No comments: