Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 February, 2010

जेम्स मृत्यूप्रकरणाने कुळे भागात खळबळ


उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार
घाईत अंत्यविधी उरकणाऱ्यांची पळापळ


कुळे दि. ३ (प्रतिनिधी) - येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेम्स आल्मेदा याच्या अचानक झालेल्या गूढ मृत्यमुळे कुळे परिसरात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. आधी जेम्सचा अचानकपणे झालेला मृत्यू आणि नंतर कुटुंबीयांविना घिसाडघाईने उरकण्यात आलेला त्याचा अंत्यविधी याची आता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) सायंकाळी कुळ्याचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली.
कुंदापूर कोडी मंगलोर येथील मूळ रहिवासी असलेला जेम्स गेली काही वर्षे येथील गोकुळ बार अँड रेस्टारंटमध्ये काम करीत होता. २३ रोजी अचानकपणे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून कोणालाही कल्पना न देता त्याचा दफनविधीही करण्यात आला. त्यासाठी जेम्स याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दाखला एका अनधिकृत व्यक्तीकडून घेण्यात आला. ही व्यक्ती गावात रूग्णांना तात्पुरते दवापाणी करण्याचे काम करते.
यापूर्वी अनधिकृतपणे दिलेल्या दाखल्यापायी रोहिदास नाईक नावाचा हा इसम किमान दोन वेळा अडचणीत आला होता. त्याला यापूर्वी अटक झाल्याचेही सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थानिक पंचायतीला या गोष्टीची स्पष्ट कल्पना असतानाही त्याने दिलेल्या दाखल्याच्या आधारे पंचायत सचिवांनी त्याच्या मृत्यूचा दाखला संबंधित रेस्टॉरंटच्या मालकाला दिला. हा दाखला स्थानिक चर्चला सादर केल्यानंतर कुळे येथे ख्रिस्ती दफनभूमीत जेम्सचे अंत्यविधी उरकण्यात आले.
जेम्स याचा मृत्यूची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कुळे परिसरात सुरू होती. त्याचा मृत्यू नैसर्गिक नसावा असा नागरिकांना संशय आहे. ज्या प्रकारे शवविच्छेदन न करता व त्याच्या कुटुंबीयांनाही कसलीही कल्पना न देता दफनविधी उरकण्यात आला तो प्रकार कोणाच्याही मनात शंका निर्माण करणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
"गोवादूत'च्या ३ फेब्रुवारीच्या अंकात हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाल्यानंतर आधीच्या दबक्या आवाजातील चर्चेचे रूपांतर जाहीर चर्चेत झाले आहे. कुळे नागरिक समितीनेच काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जेम्सच्या मृत्यूची कसून चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर सदर वृत्त प्रसिध्द होताच समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कुळे पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. तत्पूर्वी चौकशीच्या मागणीचे निवेदन दक्षिण उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनाही देण्यात आले. निवेदनाची हीच प्रत त्यांनी निरीक्षकांनाही दिली. परिणामी या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, असे आश्वासन निरीक्षक श्री. म्हार्दोळकर यांनी नागरिक समितीला दिले आहे. दरम्यान, उद्या (गुरुवारी) स्वतः उपजिल्हाधिकारी कुळेला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जेम्सच्या मृत्यूचा दाखला दिलेला त्या इसमाने दबाव आल्यामुळेच आपण तो दाखला दिला असल्याचे काहींना सांगितल्याचे समजते.

No comments: