Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 February, 2010

पंचवाडीतील तो प्रकल्प जनहितार्थ कसा?


- संतप्त ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

- पर्यावरणवादी व सामाजिक संस्थांकडे मदतीसाठी हाक



पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावात खनिज वाहतूक रस्ता व नियोजित विजर खाजन बंदर हे प्रकल्प खरोखरच जनहितार्थ आहेत हे खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पंचवाडी गावात येऊन लोकांना पटवून द्यावे, असे जाहीर आव्हान पंचवाडीवासीयांनी दिले आहे. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा आहे हे जनतेला पटवून देण्याचे आव्हान मुख्यमंत्री कामत स्वीकारतील काय व येथील लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करतील काय, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सेझा गोवा खाण कंपनीला आपल्या कोडली खाणीवरून खनिजाची वाहतूक करण्याची मोकळीक मिळावी या एकमेव उद्देशाने या नियोजित प्रकल्पाची आखणी करण्यात आल्याचा आरोप पंचवाडीवासीयांनी केला आहे. भूसंपादन करताना लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी या प्रकल्पाला जनहितार्थाचे लेबल लावण्यात आले आहे. पंचवाडीतील गरीब शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या पोटावर पाय ठेवून बड्या खाण कंपनीचे लाड पुरवण्यासाठी सरकारने अशा प्रकारे पायघड्या घालणे म्हणजे या लोकांच्या जिवावरच उदार होण्याची कृती आहे. स्वतःला आम आदमीचे मुख्यमंत्री म्हणवून घेण्याची पात्रता या प्रकरणामुळे कामत यांना राहणार नाही, अशा कडक शब्दांत या लोकांनी सरकारच्या या जनताविरोधी कृतीचा समाचार घेतला आहे. पंचवाडी पंचक्रोशीतील पॅरीश चर्चचे फादर लॉरेन्स रॉड्रिगीस यांनी यानिमित्ताने लोकांचे मार्गदर्शन सुरू केले असले तरी हे प्रकरण आता थेट आर्च बिशपपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विजर पंचवाडी येथील श्री सातेरी देवस्थान समितीनेही या प्रकल्पाविरोधात दंड थोपटल्याने त्यांनीही याप्रकरणी जनजागृतीला प्रारंभ केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यासाठी ५३ लाख रुपयांची तरतूदही केली आहे. या पैशांचे वाटप लवकरात लवकर करून लोकांत फूट
पाडण्याचा डाव आखण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. एकदा का जमीन संपादनाचे पैसे वाटण्यास सुरुवात झाली की या लोकांना या प्रकल्पाच्या विरोधी आंदोलनात भाग घेऊ नका, असे सांगितले जाईल व हे आंदोलन चिरडून टाकण्याचेही प्रयत्न होतील, अशी भितीही व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यावरणवादी व कृषितज्ज्ञांना मदतीचे आवाहन
पंचवाडीवासीयांवर ओढवलेल्या या संकटसमयी त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी राज्यातील पर्यावरणवादी व कृषितज्ज्ञांना आवाहन केले आहे. या गावात बहुतांश लोक गरीब व कष्टकरी आहेत. काही सुशिक्षित लोक राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनून याप्रकरणी गप्प आहेत तर काही लोकांना या प्रकल्पामुळे ट्रक व्यवसायाचे गाजर दाखवून गप्प करण्यात आले आहे. पंचवाडी हा शेतीप्रधान व पूर्णपणे नैसर्गिक संपत्तीने बहरलेला गाव आहे. अशा या गावावर केवळ कुणा एका खाण कंपनीचे चोचले पुरवण्यासाठी खनिजाची धूळ माखवून येथील लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर नांगर फिरवण्याची कृती निषेधार्ह असल्याची टीकाही या लोकांनी केली आहे. राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी व खाणीच्या विळख्यातून गोव्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या सामाजिक संस्थांना पंचवाडीवासीयांनी मदतीसाठी हाक दिली आहे.

No comments: