Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 January, 2010

दोन लाख खारफुटी नष्ट करण्याचा डाव

विजर खाजन बंदराला पंचवाडीकरांचा ठाम विरोध
अखेरपर्यंत लढा देण्याचा निर्धार


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- "सेझा गोवा'च्या कोडली खाणीवरील खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी पंचवाडी गावातून जाणाऱ्या नियोजित रस्त्यासाठी सुमारे दोन लाख चौरसमीटर जागेतील जुवारी नदीच्या किनारी वसलेली खारफुटी (मॅग्रोव्हज) वनस्पती नष्ट करण्याचे कुटील कारस्थान सध्या रचले जात असून त्याला विरोध करण्यासाठी पंचवाडीच्या ग्रामस्थांनी सध्या जोरदार संघर्षाची तयारी चालविली आहे. एका खाण कंपनीचे हित राखून स्वतःचे उखळ पांढरे करू पाहणाऱ्या काहींनी पंचवाडीसारख्या निसर्गसंपन्न गावावरच खनिज प्रदूषणाच्या माध्यमातून नांगर फिरवण्याचा काही लोकांचा डाव आहे व तो अजिबात यशस्वी होऊ दिला जाणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत या संकटाशी आम्ही लढा देऊ असा ठाम निर्धार पंचवाडीवासियांनी केला आहे. गावातून रस्ता नेऊ दिला जाणार नाहीच परंतु एकाही खारफुटीला हात लावू देणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतप्त भावना "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केल्या.
आतापर्यंत खाणीच्या विळख्यातून चार हात दूर राहिलेल्या शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावावर सध्या नियोजित खनिज रस्ता व खनिज हाताळणी बंदर प्रकल्पाचे अरिष्ट ओढवले आहे. या गावातील गरीब शेतकरीबंधू व कष्टकरी वर्गाच्या अज्ञानाचा फायदा उठवून, गावातील काही लोकांना ट्रक व्यवसाय व रोजगाराचे आमिष दाखवून या प्रकल्पाच्या बाजूने जनमत तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.
राज्याच्या महसूल खात्याने या प्रकल्पासाठी सुमारे ५ लाख ५४ हजार चौरसमीटर जागा संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याप्रकरणी ५३ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. आता जमिनीच्या बदल्यात या पैशांचे गाजर लोकांपुढे करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयास सुरू आहेत. या गावात बहुतेक शेतकरी व कष्टकरी समाज राहतो. या लोकांना सहजपणे पैशांचे आमिष दाखवणे शक्य असल्याने त्यांची दिशाभूल करण्याचेही घाटत आहे. या नियोजित प्रकल्पातून आपला वैयक्तिक स्वार्थ साधू पाहणाऱ्या काही लोकांना पुढे करून गावातील लोकांच्या एकजूट भंग करण्याचे प्रकार सुरू आहेत.
दरम्यान, याप्रकरणी सेंट ऍथनी पेरीश चर्चचे फादर व पंचवाडी येथील श्री सातेरी भगवती देवस्थान समिती यांनी पुढाकार घेऊन पंचवाडी गावचे जपण्यासाठी संघर्ष करण्याचे ठरविले आहे. गेल्या डिसेंबरात या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सुमारे दोन हजार लोकांच्या सह्यांचे निवेदन राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांना सादर करून त्यांचेही लक्ष याकडे वेधण्यात आले आहे.
पंचवाडी निसर्गसंपन्न आणि शेतीप्रधान गाव आहे. या भागात म्हैसाळ धरण असल्याने त्याचा पुरेपूर लाभ येथील शेतकरी कृषी उत्पादनासाठी घेतात. सुमारे २०० हेक्टर जागा ही ओलिताखाली येते. बहुतेक खाजन शेतीत लोक वर्षातून दोनदा पिके घेतात, काजू, आंबा, माड, बागायती, शेती आदीव्दारे कृषी उत्पन्न घेऊन येथील लोक आपला उदरनिर्वाह करतात. मात्र विजर खाजन येथे येऊ घातलेला खनिज हाताळणी बंदर प्रकल्प हा प्रत्यक्ष शेतीच्या अवघ्या काही अंतरावर उभारला जात असल्याने या प्रकल्पामुळे शेतीची नासाडी अटळ असल्याचे नाझारेथ गुदिन्हो व क्रिस्टो डिकॉस्टा यांनी गोवादूतशी बोलताना सांगितले. एकदा का या गावात खनिजाची वाहतूक सुरू झाली व विविध ठिकाणी खनिजाची साठवणूक झाली की, पंचवाडीत धुळीचे व खनिज मातीचे साम्राज्य पसरेल ही काळ्या दगडावरची रेष आहे. आपल्या स्वतःच्या गावाचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ पंचवाडीवासीयांवर येणार असल्याने त्या भीतीपोटीच त्यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून काही आपमतलबी लोक आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी सदर कंपनीच्या मदतीने सध्या दादागिरी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तोडा व फोडा ही नीती वापरून व राजकीय संगनमताने शिरोड्यातील पंचवाडी गावचा गळा घोटण्यासाठी पुढे सरसावलेल्या या स्वार्थांधांची अजिबात गय केली झाणार नाही. राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करून पंचवाडीतील नियोजित रस्ता व बंदर प्रकल्पाचा विचार सोडला नाही तर पंचवाडी ग्रामस्थांना आपल्या गावच्या रक्षणासाठी लढा उभारावा लागेल व त्याच्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसे निवेदनही त्यांनी विविध खात्यांना सादर केले आहे. शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी आपला पूर्ण पाठिंबा पंचवाडीवासीयांना व्यक्त केला आहे. त्यांच्या या लढ्यात आपण अग्रेसर राहणार असल्याचेही ते म्हणाले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय आपण उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: