Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 February, 2010

पंचवाडीच्या रक्षणासाठी खनिज प्रकल्पविरोधी ठराव संमत करा

पंचवाडी बचाव समितीचे आवाहन

उद्याची ग्रामसभा वादळी ठरणार

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- पंचवाडी गावातील सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित खनिज रस्ता व बंदर प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. उद्या दि. ७ रोजी या विषयावरून विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून पंचवाडीचे अस्तित्व राखायचे असेल तर बहुसंख्य ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहून या प्रकल्पाच्या विरोधात ठराव संमत करून घ्यावा, असे आवाहन पंचवाडी बचाव समितीने केले आहे. दरम्यान, कंपनीकडूनही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ लोकांची जमवाजमव सुरू केल्याने गावातील वातावरण बरेच तणावग्रस्त बनले आहे.
शिरोड्यातील पंचवाडी या निसर्गसुंदर व शेतीप्रधान गावावर सध्या सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित प्रकल्पाची पडछाया पसरली आहे. सेझा गोवाच्या कोडली खाणीवरून खनिजाची वाहतूक मोकळेपणाने करण्यासाठी कोडली ते पंचवाडी असा खास खनिज रस्ता व पंचवाडी येथे खनिज हाताळणी प्रकल्पाची आखणी केली आहे. राज्य सरकारने खाजगी कंपनीसाठी सुमारे ५ लाख ५४ हजार चौरस मीटर जागा सार्वजनिक हितासाठीचे कलम लावून संपादित केली आहे. पाणोई, नवेभाट, मुशेर, मालेतळी व विजरभाट या मार्गाने हा रस्ता पंचवाडीत येणार असल्याने त्यामुळे या गावचा ऱ्हास हा निश्चित असल्याचे समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी सांगितले. सावर्डे व कुडचडेसारख्या भागांची खनिज वाहतुकीमुळे काय दुर्दशा झाली आहे हे लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे पंचवाडीवासीय आपला गाव या खाजगी कंपनीला आपल्या घशात घालू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंचवाडी गावातील सर्व लोकांनी एकत्रितरीत्या हा डाव हाणून पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले. गावाबाहेर स्थायिक झालेले व प्रत्यक्ष जमीन नसलेले लोकच या प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. कंपनीच्या सांगण्यावरून फोंड्यात एका अलिशान हॉटेलात पत्रकार परिषद घेऊन या नियोजित प्रकल्पाचे समर्थन करणारे आगोस्तिन डिकॉस्ता यांनी आपल्यासोबत ७० लोक असल्याचा दावा केला आहे. मात्र केवळ ७० लोक म्हणजे पंचवाडी गाव नव्हे; उर्वरित हजारो लोक या प्रकल्पाच्या विरोधात आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून शेतकऱ्यांना पैसे वाटण्यासाठी लगबगही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे नेमण्यात आलेल्या भूसंपादन अधिकारी उपासना माजगांवकर यांनी भूसंपादनाचा आदेश जारी केला आहे. पण त्यात नियोजित ५ लाख ५४ हजार चौरस मीटरपैकी केवळ ३,९३,३११ चौरस मीटर जागाच संपादित केल्याचे म्हटले आहे. कोडली, म्हैसाळ व कामरखंड या भागांतील १,६१,४०९ चौरस मीटर जागा सोडण्यात आली आहे. आता कोडली ते पंचवाडी अशा या प्रकल्पासाठी केवळ पंचवाडीवासीयांचीच जागा संपादन करून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. या एकूण प्रकरणी सरकार पूर्णपणे कंपनीच्या हितासाठी वावरत असून पंचवाडीवासीयांना सरकारने पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे. अशा वेळी पंचवाडीवासीयांनी खबरदारी घेतली नाही तर भविष्यात त्यांना आपल्या गावाला मुकावे लागेल, असाही खबरदारीचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, ७ रोजीची ग्रामसभा खुल्या जागेत घेण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिस संरक्षणाचीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments: