Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 June, 2010

वरिष्ठ पोलिसांचाही ड्रगव्यवसायाला आशीर्वाद

मुख्यमंत्री, पोलिसांकडे आणखी एक तक्रार सादर

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - पोलिस खात्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी किनारपट्टी भागात नेपाळी आणि काश्मिरी लोकांना हाताशी धरून अमलीपदार्थांचा व्यवहार करीत आहेत. यासंदर्भात एका व्यक्तीने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे तक्रार केली असून त्याची खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची एक प्रत पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी व दक्षता विभागाच्या सचिवांना या तक्रारीची प्रत पाठवण्यात आली आहे. पोलिस आणि ड्रग माफिया साटेलोटे हे केवळ सात पोलिसांपुरते मर्यादित नसून त्यात अनेक पोलिस अधिकारी आणि शिपाई गुंतल्याचे या तक्रारीमुळे उघड झाले आहे.
सदर तक्रार करणाऱ्या व्यक्तीने नाव आणि सहीसह ही तक्रार केली असून आपले नावे उघड न करण्याची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारच्या दोन तक्रारी आल्या असून त्या तक्रारींना सरळ कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली आहे. तक्रारीनुसार, २००८-०९च्या पर्यटन मोसमात तक्रारदार हरमल येथील शिवकृपा जनरल स्टोअरच्या जवळच कपड्याचे स्टॉल घालून कपड्यांची विक्री करीत होता. या भागात मुख्य ड्रग व्यवहार करणाऱ्याचा भाऊ भालचंद्र वायंगणकर याने "१० तोळा' चरस तक्रारदाराला विक्री कण्यासाठी दिला. कपड्याच्या दुकानावर येणाऱ्या विदेशी नागरिकांना हा अमलीपदार्थ विकण्याची ताकीद त्याला देण्यात आली. तो अशाच पद्धतीने अनेक नेपाळी, काश्मिरी आणि पुष्कर (राजस्थान) येथील स्टॉलवाल्यांना हाताशी धरून अमली पदार्थाचा व्यापार करतो. या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी पोलिस खात्यातील दोन पोलिस उपअधीक्षकांना हप्ता पुरवला जात असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच त्या दोन्ही पोलिस उपअधीक्षकांची नावेही त्या तक्रारीत नमूद केली आहेत. त्यांच्यासाठी अभय पालेकर हा पोलिस शिपाई हप्ता गोळा करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारदाराने आपल्या स्टॉलवरून अमलीपदार्थ विक्री करण्यास मनाई केली असता भालचंद्र व त्याला नातेवाईक असलेला पोलिस शिपाई राजेश सावंत यांनी तक्रारदाराच्या दुकानात एक किलो "चरस' ठेऊन ही पिशवी तुझ्या दुकानात सापडल्याची खोटी तक्रार करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. तसेच अटक न करण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्याच दिवशी तक्रारदाराने आपले स्टॉल बंद करून रात्री ८.४५ वाजता मुंबई मार्गे राजस्थान येथील आपले गाव गाठले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सध्या दयानंद परब कळंगुट येथून आणखी एका पोलिस उपअधीक्षकासाठी हप्ता गोळा करीत असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या पोलिस उपअधीक्षकाच्या मालमत्तेची चौकशी केल्यास हे पैसे त्याच्याकडे कोठून आले हे उघड होणार असल्याचेही तक्रारीत शेवटी म्हटले आहे. यामुळे या तक्रारीची चौकशी पोलिस खाते करणार की पुन्हा कचऱ्याची टोपली दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

No comments: