Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 June, 2010

लकी गुंतलीय महत्त्वाच्या कामात : देशपांडे

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): ड्रग माफियांशी पोलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप करणारी लकी फार्महाऊस ही अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त असावी, त्यामुळेच ती या प्रकरणी जबाब देण्यासाठी गोव्यात उपस्थित राहत नसावी, असे मत पोलिस अधीक्षक तथा पोलिस खात्याचे प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी आज व्यक्त केले. लकीशी दोनदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून तिने ऑगस्ट महिन्यात जबाब देण्यासाठी गोव्यात हजर होणार असल्याचे कळवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
"अटाला' याचे छायाचित्रीकरण "यू ट्यूब'वर प्रसारित केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात असून तो कोठे व कधी या संकेतस्थळावर "अपलोड' करण्यात आला, याची माहिती या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याकडे आलेली असावी, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाचा भांडाफोड करणारी लकी फार्महाऊस हिचा जबाब या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा असून पोलिस तो नोंद करून घेण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचे उघड होत आहे.
दरम्यान, अटालाकडे अधिकृत व्हिसा नसल्याने त्याला अटक होऊ शकते काय, असे प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांना विचारले असता, अनधिकृतपणे गोव्यात राहणाऱ्या विदेशी व्यक्तींना ठेवण्यासाठी कोणतीच जागा उपलब्ध नाही. त्यासाठी राज्य सरकारने जागा निश्चित करून त्यांच्या जेवणाची व त्यांना त्यांच्या देशात पाठवून देण्याची सोय करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
----------------------------------------------------
अधिकृत व्हिसा नसलेल्या विदेशी लोकांना ठेवण्यासाठी योग्य जागा पोलिसांकडे नसल्याने "अटाला'ला पुन्हा ताब्यात घेण्याचा शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. "अटाला' याला ड्रग - पोलिसांशी संबंधप्रकरणी जामीन मिळाला असला तरी त्याच्याकडे अधिकृत व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी पुन्हा अटक होऊ शकते. मात्र पोलिसच त्याबाबत निरुत्साही असल्याने अटाला बेकायदेशीर गोव्यात वास्तव्य करणार आहे. तर, दुसऱ्या बाजूने त्याला न्यायालयाने देश न सोडण्याचे आदेश दिले आहेत.

No comments: