Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 June, 2010

बाबूशविरुद्ध सीबीआयचे दुसरे आरोपपत्र दाखल

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): युजीडीपीचे आमदार तथा राज्याचे शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज दुपारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या मुहूर्तावर केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय)ने बाबूश यांच्यावर दुसरे आरोपपत्र दाखल केले. पणजी पोलिस स्थानकावर मोर्चा आणून दगडफेक केल्याच्या आणि पोलिसांना धमकावल्याच्या आरोपाखाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले आहे. बाबूश यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी ते या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भा.दं.सं १४३, १४७, ३२३, १४८ व १४९ तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण कायदा ३ कलमानुसार त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.
बाबूश मोन्सेरात यांच्यासह अन्य शंभर जणांवर हे आरोपपत्र आहे. यात त्याचे एकेकाळचे खंदे समर्थक माजी महापौर टोनी रोड्रिगीस, दयानंद कारापूरकर, उदय मडकईकर, ऍन्थनी बार्रेटो, यांच्यावरही हे आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी सीबीआयने दि. २९ ऑक्टोबर २००९ साली पोलिस स्थानकावर मोर्चा आणून हल्ला केल्याचे आरोपपत्र दाखल केले होते. दि. १८ फेब्रुवारी रोजी बाबूश मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात व त्यांच्या अन्य समर्थकांनी पोलिस स्थानकावर मोर्चा आणून हल्लाबोल केला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला करून जमाव पांगवला होता. त्यानंतर बाबूश मोन्सेरात, टोनी रॉड्रिगीस व अन्य काही जण पुन्हा पोलिस स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी पुन्हा पोलिसांशी हुज्जत घातली व पोलिस स्थानकाची नासधूस केली, अशी दुसरी तक्रार त्यांच्यावर होती. त्याप्रकरणाची चौकशी पूर्ण करून सीबीआयने आज हे आरोपपत्र दाखल केले आहे.

No comments: