Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 June, 2010

अटाला जामिनावर सुटला

गुन्हा अन्वेषण विभागाची नाचक्की
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गुन्हा अन्वेषण विभागाने सादर केलेल्या अपुऱ्या पुराव्यामुळे उत्तर गोव्यात अमलीपदार्थांचा व्यवहार करणारा ड्रग माफिया एनीव बेनाईम ऊर्फ "अटाला' याला आज अमलीपदार्थ विरोधी न्यायालयाने सशर्त जामिनमुक्त केले. "अटाला' याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने अटालाशी पोलिसांचे असलेल्या घनिष्ठ संबंधाचे छायाचित्रीकरण "यू ट्यूब'वर प्रसारित केल्यानंतर सात पोलिसांना निलंबित करून त्यांना पोलिस कोठडीत घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी या पोलिसांना जामिनमुक्त करण्यात आल्याने हे प्रकरण कमकुवत बनवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होऊ लागली आहे.
गेल्या मार्च महिन्यात अटक करण्यात आलेल्या अटालाची ५० हजार रुपयांच्या हमीवर व किनारी भागात प्रवेश न करण्याच्या अटीवर न्यायालयाने मुक्तता केली. तसेच त्याचा पासपोर्ट "सीआयडी'त जमा करून गरज भासेल तेव्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहे. "अटाला' हा या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असून त्याला पोलिसांनी साक्षीदार बनवण्याचे सोडून आरोपी करून तुरुंगात का डांबले, असे स्पष्टीकरण मागवताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
अटाला याला जामीन मिळाला असला तरी त्याचा "यू ट्यूब'वर पर्दाफाश करणारी मॉडेल लकी फार्महाऊस हिला कोणताही धोका नसल्याचा दावा या प्रकरणाचे तपास अधिकारी उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी केला आहे. लकीने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तिचा जबाब नोंद करून घेण्यासाठी आम्ही तिची प्रतीक्षा करीत आहोत, असे श्री. साळगावकर यावेळी म्हणाले. गेल्या महिन्यात लकी फार्महाऊस हिने "अटाला' याच्याकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
नादिया मृत्युप्रकरणात माजी मंत्री मिकी पाशेको यांना अटक करण्यात गुन्हा अन्वेषण विभाग गुंतलेला असताना एका ड्रग माफियाच्या विरोधात पुरावे सादर करण्यास "सीआयडी'ला अपयश येत असल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवर अमलीपदार्थांचा व्यवसाय अटाला करत होता, त्याला संरक्षण देण्यासाठी काही पोलिस त्याच्याकडून हप्ता घेत होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. तसेच, एका मंत्र्याच्या मुलाचाही अटालाशी संबंध असल्याचा आरोप करताना त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा लकी फार्महाऊस हिने केला होता.

No comments: