Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 June, 2010

'आम आदमीच्या जखमेवर मीठ'

पणजी, दि. २५ : कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशात पुन्हा एकदा डिझेल, पेट्रोल, केरोसीन तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली असून हा आम आदमीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका भाजप विधिमंडळ प्रवक्ता आमदार दामोदर नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळून जात असताना त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणून कॉंग्रेस सरकारने आजपासून पेट्रोल रु. ३.५०, डिझेल रु. २, केरोसीन रु.३ तसेच स्वयंपाक गॅस रु. ३५ भाववाढ करून सामान्य जनतेचे जगणे कठीण करून सोडले आहे.महिलांना वटपौर्णिमेची ही एक भेट आहे काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरवाढ सामान्य जनतेपुढे गंभीर समस्या बनली असून तिला आळा घालण्यास तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यास कॉंग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे, असेही आमदार नाईक यांनी म्हटले आहे.
देशात २००४ साली भाजपचे सरकार सत्तेवर असताना जीवनावश्यक वस्तूंचे दर व सध्याचे दर पाहता कॉंग्रेस सरकार आम आदमीला कोणत्या खाईत ढकलू पाहत आहे, हे लक्षात येते. संपुआ सरकार सत्तेवर आल्यापासून जवळजवळ ५ वेळा भाववाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत आपले सरकार सत्तेवर आल्यास अवघ्या १०० दिवसांच्या आत दरवाढ कमी करू असे आश्वासन दिल्याने जनतेने त्यांना मते दिली व आपल्या देशात कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकार सत्तेवर आले. मात्र, अवघ्या काळातच महागाईचा भडका उडाला आणि आज दरवाढीचे प्रमाण १९.९५ टक्क्यांवर पोचले आहे. ही आम आदमीची फसवणूक असून सरकारच्या या जनविरोधी निर्णयाला भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे विरोध केला आहे. सरकारने दरवाढीवर नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा कडक इशारा आमदार नाईक यांनी दिला आहे.

No comments: