Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 June, 2010

गृहखात्याच्या हलगर्जीपणामुळे अटाला सुटला

साटेलोटे असल्याचा आरोपांबाबत खुलासा करण्याची भाजपची मागणी

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- ड्रग माफिया अटाला याला जामीन मंजूर होण्यामागे पोलिस खात्याचा हलगर्जीपणाच कारणीभूत ठरला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच अटाला मोकळा सुटला, असा ठपका भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज ठेवला. अटाला याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने ड्रग प्रकरणांत एका मंत्र्यांच्या पुत्राचा सहभाग असल्याचा जो गौप्यस्फोट केला त्याची चौकशी करण्यास गृहखाते चालढकल करीत असल्याने जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या आरोपांबाबतचा खुलासा करावा, अशी मागणीही श्री. आर्लेकर यांनी केली.
आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. आर्लेकर बोलत होते. अटाला व या प्रकरणातील पोलिसांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाकडून पोलिस तपासाबाबत जे ताशेरे ओढण्यात आले, त्यावरून या प्रकरणी पोलिस व सरकारही गंभीर नाही, असेच उघड होते. या सर्व प्रकरणाला गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पोलिस खाते जबाबदार असून सरकारलाच या प्रकरणाची चौकशी नको की काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. लकी फार्महाऊस हिची मुलाखत घेण्यासाठी पोलिसांकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. तिने पोलिसांसमोर येऊन त्यांना ही सगळी माहिती आयती द्यावी, अशी पोलिसांची इच्छा आहे काय, असा टोलाही यावेळी श्री. आर्लेकर यांनी हाणला. या एकूण प्रकरणात पोलिसांची भूमिका पाहिल्यास जनतेने पोलिसांवर कसा काय विश्वास ठेवावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात सरकारातील एका मंत्र्यांचा पुत्र सहभागी आहे, असा आरोप झाल्यानेच ही चौकशी रेंगाळत आहे, असा समज जनतेचा बनला असून सरकारने ताबडतोब याबाबत खुलासा करून जनतेच्या मनातील ही शंका दूर करावी, अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली.
पाठ्यपुस्तके व रेनकोट कधी मिळणार
शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अद्याप पाठ्यपुस्तकांचा पत्ता नाही. पावसाळा सुरू झाला तरी रेनकोटही वितरित झाले नाही. हे रेनकोट यंदाही डिसेंबर महिन्यातच मिळणार का, अशी खिल्ली श्री. आर्लेकर यांनी उडवली. विद्यार्थ्यांना सुविधा देण्यापेक्षा विविध सामानांसाठीच्या निविदेतील कमिशनकडेच सरकारी अधिकाऱ्यांची नजर आहे व त्यामुळेच हा घोळ निर्माण झाला आहे. येत्या आठवड्याच्या आत पाठ्यपुस्तके व रेनकोट मिळणार याची दक्षता शिक्षण खात्याने घेतली पाहिजे. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना कॉंग्रेस प्रवेशाची घाई झाली होती म्हणूनच कदाचित त्यांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असावे, असा टोलाही यावेळी श्री.आर्लेकर यांनी हाणला.

No comments: