Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 June, 2010

पीर्ण येथे खाण नकोच!

नागरिक कृती समितीचा इशारा
पर्यावरण मंत्रालयाच्या समितीकडून पाहणी

म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): पीर्ण नादोडा पठारावर होऊ घातलेल्या नियोजित सेझा गोवाच्या खाण प्रकल्पाला नादोडावासीयांनी कडाडून विरोध केला असून गरज पडल्यास रस्त्यावर येऊ, असा इशारा नागरिक कृती समितीचे अध्यक्ष योगानंद गावस यांनी आज दिला.
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या समितीसमोर आज पीर्ण व नादोडा गावातील नागरिकांनी आपली कैफियत मांडली. खाण प्रकल्प सुरू झाल्यास येथील हिरवीगार वनराई नष्ट होईल, स्थानिकांना खाणीच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल आणि प्रत्यक्ष रोगराईला आमंत्रण दिले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. यामुळे कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी खाण नकोच, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
पीर्ण नादोडा कृती समितीने खाण विरोधात केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडे खाणीच्या विरोधात याचिका सादर केली होती. यावर न्यायालयाने या भागाची पाहणी करण्यासाठी उपसमिती स्थापन करून १५ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने डॉ. व्ही. के. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजेश श्रीवास्तव, डॉ. बी. के. मिश्रा व डॉ. एल. अजय कुमार यांची उपसमिती स्थापन केली होती.
आज समितीने या ठिकाणी येऊन पाहणी केली. यावेळी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष योगानंद गावस, महादेव गावस, सॅबेस्त्यॉंव फर्नांडिस, सरपंच मधुरा मांद्रेकर, ज्योकिम कोन्सेसाव, शशीधर बांदेकर, उमेश नाईक यांनी आपले विचार मांडताना खाणीला जोरदार विरोध केला. यावेळी समितीच्या सदस्यांनी नियोजित खाणीच्या जागेवर पाहणी केली व सत्य पडताळून न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

No comments: