Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 21 June, 2010

सायनाने रचला इतिहास

सुपर सीरिजचे दुसरे जेतेपद

सिंगापूर, दि. २० - भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या कारकीर्दीत आणखी एक उपलब्धी मिळविताना इतिहास रचला. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकविताना तिने चिनी तैपेईच्या जू यिंग तेईचा सरळ दोन गेम्समध्ये धुव्वा उडवला. विशेष म्हणजे गेल्या याच महिन्यात सायनाने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला होता. दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकणारी सायना नेहवाल ही भारताची पहिली खेळाडू आहे.
अग्रमानांकित सायनाला ही अंतिम लढत जिंकण्यासाठी खास परिश्रम घ्यावेच लागले नाहीत आणि तिने अवघ्या ३३ मिनिटांच्या खेळात जू यिंग तेईचे आव्हान २१-१८, २१-१५ असे परतवून लावले. जागतिक क्रमवारीत सहाव्या रॅंकिंगवर असलेली सायना ही या स्पर्धेतील एकमेव आव्हान होती. इतर भारतीय स्पर्धक उपान्त्य फेरीतच हरल्यामुळे सर्वांचे लक्ष सायनाच्या खेळाकडे लागले होते.
सुपर सीरिज जिंकल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सायना म्हणाली की, अंतिम फेरीत पोहोचेल असे मला वाटले नव्हते. कारण चीनच्या दोन अव्वल खेळाडू या जेतेपदाच्या शर्यतीत होत्या. परंतु, मला विश्वास होता आणि शेवटी निकाल माझ्याच बाजूने लागला. ही स्पर्धा जिंकण्यापूर्वी सायना नेहवालने अलीकडेच झालेल्या इंडियन ओपन ग्रांप्री स्पर्धेचे उपविजेतेपद पटकविताना आपल्या आशा उंचावल्या होत्या.
अंतिम सामन्यातील पहिल्या गेम चांगलाच चुरशीचा झाला. जू यिंगने मला चांगलीच लढत दिली, असे सांगून सांगून सायना म्हणाले की, १८-१८ अशी बरोबरी होती. त्यामुळे विजयाचे पारडे कुणाकडे झुकणार हे सांगता येत नव्हते. त्यानंतर सायनाने शानदार खेळ करीत उर्वरित तिन्ही गुण- पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने तिला शेवटपर्यंत पुढे सरकण्याची संधीच दिली नाही. तिचा आत्मविश्वास वाढत होता. त्यामुळे मी आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आणि त्याचा मला फायदाही झाला, असेही ती म्हणाली. सामना सुरू होण्यापूर्वी मी थोडी निराश होती, हे सामनाने मान्य केले. या विजयामुळे रॅंकिंग मला फायदा होईल. पण, मी रॅंकिंगकडे कधीच लक्ष देत नाही. सतत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करीत असते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सायना म्हणाली. आता आपले लक्ष विश्व आणि राष्ट्रकुल स्पर्धेवर केंद्रित करणार असल्याचे तिने सांगितले. पण, त्या अगोदर येत्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया ओपन स्पर्धेची तयारी करण्याकडे माझा जोर राहील.
दरम्यान भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष व्ही. के. वर्मा यांनी देशाचे नाव पुन्हा एकदा रोशन केल्याबद्दल सायना नेहवालचे अभिनंदन केले आणि २०१२ मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये ती देशाला सुवर्ण जिंकून देईल, अशी आशा व्यक्त केली.

No comments: