Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 June, 2010

हायवेचा नियोजित आराखडा म्हणजे विनाशाचे पर्वच - पर्रीकर

लोकवस्तीमधून राष्ट्रीय महामार्ग अजिबात नको
फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी) - राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित आराखड्यामुळे गोव्यात विकासाचे नव्हे तर विनाशाचे पर्व येणार आहे. या नियोजित महामार्गाचा संपूर्ण गोव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून लोकवस्ती, गावातून नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यास विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी "डायव्हर्शन एनएच ४ ए ऍक्शन समिती गोवा'ने हवेली कुर्टी येथील सावित्री सभागृहात आयोजित जाहीर सभेत बोलताना आज (दि.१९) संध्याकाळी केले आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील देसाई, माजी सभापती अँड. विश्र्वास सतरकर, माजी आमदार रोहिदास नाईक, माजी आमदार सदाशिव मराठे, माजी आमदार फातिमा डिसा, उसगावच्या सरपंच सौ. कांती गावडे, कुर्टीच्या पंच सदस्य सौ. मधुमती गर्दे, नवीन तहसिलदार, संजय नाईक, अक्षय खांडेपारकर, राजाराम पारकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार करताना घरे, आस्थापने, धार्मिक स्थळांवर नांगर फिरवू नका. राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नाही. तथापि, गाव, लोकवस्तीच्या बाहेरून नवीन महामार्ग तयार करा, अशी मागणी या जाहीर सभेत करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ ए च्या सध्याच्या आराखड्यात एक महिन्यात बदल करून लोकवस्तीच्या बाहेर राष्ट्रीय महामार्ग तयार करावा. लोकांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा समितीचे अध्यक्ष सुनील देसाई यांनी दिला.
गृहमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांना राष्ट्रीय महामार्गामुळे निर्माण झालेली गंभीर समस्या सोडविण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी बांधकाम मंत्र्यांनी स्थापन केलेल्या अभ्यास समितीचे अध्यक्षपदी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना लोकांची खरच तळमळ असती तर हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असता, अशी टीका सुनील देसाई यांनी केली.
या सभेला सर्व संबंधित आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, संबंधित सर्व आमदारांनी सभेला येण्याचे टाळल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
श्री. पर्रीकर म्हणाले की, देशातील विविध भागात राष्ट्रीय महामार्ग हे लोकवस्ती, गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे गोव्यातील महामार्गदेखील लोकवस्ती, गावाच्या बाहेरून काढण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग एनएच ४ ए च्या सध्याच्या आराखड्यामुळे कित्येक घरे, व्यावसायिक आस्थापने, इमारती मोडाव्या लागणार आहेत. या रस्त्यामुळे गावांचे विभाजन होऊन गावांचे अस्तित्व नष्ट होणार आहे.
केरळसारख्या राज्यात कमी म्हणजे १९ मीटर जागेतूनही महामार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग तयार करताना त्याला वेगळा "नॉर्म' लावावा लागणार आहे. लोकवस्ती, गावातून राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यास कणखरपणे विरोध करण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रीय महामार्गाला विरोध न करण्यासाठी लोकांना आमिषे दाखविली जातील. ह्या आमिषांना बळी पडू नका. धमक्याही दिल्या जाणार आहेत. मात्र घाबरून जाण्याची गरज नाही. खंबीरपणे राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात उभे राहण्याची नितांत गरज आहे, असेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
चुकीच्या रुंदीकरणाला विरोध करण्यासाठी आयोजित जाहीर सभेला संबंधित सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. हे आंदोलन कुठल्याही एका राजकीय पक्ष, जाती किंवा धर्माचे नव्हते. त्यामुळे लोकांना पाठिंबा देण्यासाठी संबंधित आमदारांनी या सभेला उपस्थित राहण्याची नितांत गरज होती. लोकांवर आलेल्या संकटाच्या वेळी लोकांना साहाय्य न करणाऱ्या राजकारण्यांना आता लोकांनीच धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनलेले आहे. केवल कमिशन मिळविण्यासाठी गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका पर्रीकर यांनी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्र्वासन पर्रीकर यांनी दिले.
सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या आराखड्याला विरोध करण्यासाठी जाती, धर्म, पक्ष विसरून लोकांनी एकजूट होऊन लढा देण्याची गरज आहे. ह्या राष्ट्रीय महामार्गामुळे लोकांना योग्य प्रमाणात नुकसान भरपाईदेखील मिळणार नाही, असे अँड. विश्र्वास सतरकर यांनी सांगितले.
आम आदमीचा उदोउदो करणाऱ्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आम आदमीला जाम करून टाकले आहे, अशी टीका माजी आमदार फातिमा डिसा यांनी केली. राष्ट्रीय महामार्ग ४ ए च्या आराखड्याला विरोध करण्यासाठी आयोजित सभेला सर्व संबंधित आमदार अनुपस्थित राहिल्याबद्दल श्रीमती डिसा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. श्रीमती डिसा भाषण करीत असताना सतत वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवून, लोकांना विस्थापित करून विकास होऊ शकत नाही, असे सांगून माजी आमदार रोहिदास नाईक म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांचा फर्मागुडी येथील पुतळा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात तोडण्याचे काम सरकार करीत आहे, ही शरमेची बाब आहे. राष्ट्रीय महामार्गाचा सध्याचा आराखडा मारक ठरणारा असून पर्यायी मार्ग तयार करण्याची नितांत गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग कुठून तयार करावा ह्याची सूचना राज्य सरकारने केंद्र सरकारला करायला हवी होती. मात्र, येथे उलट स्थिती निर्माण झालेली आहे. राजकारण्याचे हितसंबंध गुंतल्याने महामार्ग लोकवस्तीतून काढण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गावाच्या बाहेरून कुणालाही त्रास न करता रस्ता काढला जाऊ शकतो. मात्र, जुन्या रस्त्याला थोडा रुंद करून त्याला राष्ट्रीय महामार्ग करण्याची तयारी करण्यात आली आहे. लोकांच्या घरादारांवर नांगर फिरवणे योग्य नव्हे. त्यामुळे सध्याच्या रस्त्याच्या धारबांदोडा, मोले भागात कडाडून विरोध केला जाणार आहे, असे सदाशिव मराठे यांनी सांगितले.
राजाराम पारकर, संजय नाईक, श्री. पॉल (चिंबल), शंभू प्रभुदेसाई, बाप्तीस परेरा, श्री. गोम्स ( ओल्ड गोवा) यांची भाषणे झाली. अक्षय खांडेपारकर यांनी स्वागत केले. अशोक प्रभू यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कमलाकांत परब यांनी केले. या सभेला चिंबल ते मोलेदरम्यानचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: