Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 June, 2010

लोकशाहीची निव्वळ थट्टाः प्रा.पार्सेकर

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला जनतेचे काहीही पडून गेलेले नाही व हे सरकार निव्वळ सत्तेचा गैरवापर करून आपली तुंबडी भरण्यासाठीच वावरत आहे. सरकारातील एका मंत्र्याने आमदारकीचाच राजीनामा द्यावा व कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून आमदारकी नसतानाही मंत्रिपद भूषवावे ही लोकशाहीची थट्टा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना एवढीच जनतेची चाड असती तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुढे निवडून येईपर्यंत मंत्रिपदाचा स्वीकार केला नसता. दुपारी आमदारकीचा राजीनामा देऊन संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतलेले राणे एक रात्रही मंत्रिपदाशिवाय राहू शकत नाहीत, हेच त्यातून स्पष्ट झाले. आमदार पांडुरंग मडकईकर, माजीमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यासारखे नेते आमदार असूनही त्यांना मंत्रिपद मिळत नाही तर इकडे विश्वजित राणे यांना मात्र आमदार नसूनही मंत्रिपद बहाल केले जाते. आता सहा महिन्यात या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाईल व त्यामुळे जनतेच्या खिशातील लाखो रुपये खर्च केले जातील. शेवटी जनतेच्या मतांवर सुरू असलेला हा राजकीय खेळ जनतेनेच ओळखावा व या नेत्यांना अद्दल घडवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments: