Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 June, 2010

मिकी व लिंडन यांचे जामीनअर्ज फेटाळले

आता शरणागती की सर्वोच्च न्यायालय?
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्यू प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाला हवा असलेले माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको व त्यांचे "ओएसडी' लिंडन मोन्तेरो यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज तब्बल सव्वा दोन तास झालेल्या युक्तिवादानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एस. ओक यांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे या दोघांना आता पोलिसांना शरण यावे लागेल किंवा उच्च न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
हे गंभीर प्रकरण असून त्यात एका माजी मंत्र्यांची तथा आमदाराची संशयास्पद भूमिका दिसून येते, त्यामुळे त्यांची पोलिस कोठडीत चौकशी होणे गरजेचे आहे, असे निरीक्षण यावेळी न्यायालयाने अर्ज फेटाळून लावताना केले. नादियाला इस्पितळात दाखल केल्यानंतर मिकी यांची गोव्यात, मुंबई आणि चेन्नईत संशयास्पद हालचाल दिसून आली तसेच नादियाचा मोबाईल, लॅपटॉप आणि पासपोर्ट गायब असून तो हस्तगत करण्यासाठी मिकी यांना पोलिस कोठडीत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा दावा यावेळी सरकारी वकील कार्लुस फरेरा यांनी केला.
मिकी हे नादियाचे केवळ चांगले मित्र होते. तिच्या मृत्यूमागे मिकीचा कोणताही सहभाग नाही. तिला मारायचेच होते तर, तिच्या उपचारासाठी सुमारे पन्नास लाख रुपये खर्च केले नसते, असा दावा यावेळी मिकी यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी केला. नादियावर उपचार केले नाहीत तर, तिच्या घरचे मिकींचा भांडाफोड करतील याच भीतीने तिच्या उपचारावर एवढी मोठी रक्कम खर्च केली असल्याचा युक्तिवाद यावेळी ऍड. फरेरा यांनी केला. यावेळी न्यायालयाचा आवार खचाखच भरला होता. दुपारी ४.३० ते ७.१५ पर्यंत या अर्जावर सुनावणी सुरू होती. यातील दीड तास ऍड. देसाई यांनी मिकी कसे या प्रकरणात गुंतलेले नाहीत, हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकण्यासाठी नवख्या वकिलांचीही गर्दी होती. एरवी ४.३० वाजता गोवा खंडपीठाचे कामकाज संपते. मात्र यावेळी ४.३० ते सव्वा सातपर्यंत कामकाज सुरू ठेवण्यात आले होते, हे विशेष.
"ओएसडी' लिंडन मोन्तेरो यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले असताना त्यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला व त्या आदेशाचा कोणताही उल्लेख न करता नव्याने पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याने न्यायालयाने लिंडन यांचा अर्ज फेटाळून लावला. अर्ज मागे घेऊन पुन्हा नव्याने केलेल्या अर्जात आधीच्या आदेशाचा उल्लेख न केल्याने यावेळी न्यायमूर्तींनी त्यांच्या वकिलांना बरेच धारेवर धरले. हा गंभीर प्रकार असून न्यायालयाला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. याचा निवाड्यातही उल्लेख केला जाणार असल्याचा इशारा यावेळी न्यायालयाने दिला.
गुन्हा अन्वेषण विभागाने तुम्हाला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहायला सांगितले असताना तुम्ही का गायब झालात, असा प्रश्न यावेळी न्यायालयाने केला. पहिल्या दिवशी मिकी यांची पोलिसांनी तब्बल ९ तास चौकशी केली. तेव्हाच पोलिस त्यांना या प्रकरणात गुंतवणार असल्याचे ठाऊक झाले होते. पोलिस अटक करणार असल्याने संरक्षण दिल्यास उद्याही ते चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अबकारी घोटाळा आणि ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच्या आदेशाने पोलिस विनाकारण याप्रकरणात मिकींना गोवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. तिला मारायचे होते तर पन्नास लाख खर्च केला नसता, मृत्यूपूर्वी खुद्द नादिया हिने मुंबई येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मृत्यू जबाब दिला आहे. वैद्यकीय अहवालानुसार गोव्यातील इस्पितळात नादियाला दाखल करण्यात आले त्यावेळी तिच्या अंगावर एकही जखम नव्हती, असा दावा यावेळी ऍड. देसाई यांनी केला.
नादियाबरोबर मिकी राहत नव्हता. ती आपल्या आई व भाऊबरोबर राहत होती. तिच्या आईने व भावाने नादियाच्या आत्महत्येला आपण जबाबदार असल्याचे कोठेच म्हटलेले नाही. दि. १४ मे रोजी नादिया तिच्या नवऱ्याला भेटली होती. दुसऱ्या दिवशी तिने विष प्राशन केले. त्यानंतर तिच्या नवऱ्याला कोणीतरी तिचा खून झाल्याची माहिती दिली. त्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नादिया हिचा मोबाईल, लॅपटॉप गायब आहे , त्याचा शोध घेण्यासाठी मिकी यांना पोलिस कोठडीत घेण्याची कोणतीही गरज नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.
नादियाचा मृत्यू होताच तिच्या घरातील विदेशात गेलेले विमानाचे तिकीट, बॅगांना लावण्यात येणारे टॅग जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नादिया मिकी सोबत विदेश दौरे करीत होती याचे हे पुरावे असून ते जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा यावेळी श्री. फरेरा यांनी केला. नादियाचा मृत्यूपूर्वी जबाब घेतला त्यावेळी मिकी पाशेको हे मुंबईत उपस्थित होते. त्यामुळे दबावाने हा जबाब दिला असावा, अशीही शक्यता न्यायालयासमोर मांडण्यात आली. अपोलो इस्पितळाच्या अहवालात नादियाने रेटॉल घेतल्याचे म्हटले आहे. तर, मुंबई ठाणे येथील ज्युपीटर इस्पितळाच्या अहवालात तिने २० झोपेच्या गोळ्या घेतल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण एवढे साधे असते तर, दोन्ही इस्पितळाचे अहवाल वेगवेगळे नसते, असा युक्तिवाद यावेळी ऍड. फरेरा यांनी केला. विष प्राशन करण्याच्या आदल्या दिवशी मिकी नादियाच्या घरी गेला होता. त्यावेळी काय घडले, याची चौकशी होण्याची गरज आहे, असे ऍड. फरेरा म्हणाले.
------------------------------------------------------
नादियाचा नवऱ्याला 'एसएमएस'
नादियाला इस्पितळात दाखल केले त्यावेळी सुमारे तीन वाजता तिने आपल्या नवऱ्याला "एसएमएस' केला होता. त्यात तिने "तुला काही सांगायचे आहे. माझ्याकडे जास्त वेळ नाही' असे म्हटले होते. त्यामुळे तिला काय सांगायचे होते, असे नेमके काय घडले होते, याचाही शोध लावायचा आहे, असे अनेक महत्त्वाचे "एसएमएस' पोलिसांकडे असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
'बायलांचो एकवट'चा अर्ज फेटाळला
नादिया मृत्यू प्रकरणी सर्वांत आधी आम्ही तक्रार केली होती. त्यामुळे या प्रकरणात आमचीही बाजू ऐकून घेतली जावी, अशी मागणी करून ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला. त्यावेळी न्यायालयाने सध्या त्याची कोणतीही गरज नसल्याचे नमूद करून तो अर्ज फेटाळून लावला.

No comments: