Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 June, 2010

...तर सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव

वाळपईत पूर्ण ताकदीनिशी उतरणार : पर्रीकर
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): सभापती प्रतापसिंह राणे यांनी प्रलंबित अपात्रता याचिका तात्काळ निकालात काढाव्यात अन्यथा येत्या विधानसभा अधिवेशनात त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करू, असा कडक इशारा देताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वाळपई मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजप पूर्ण शक्तीनिशी उतरेल व विश्वजित राणे यांची आरोग्य व कृषी खात्यातील निष्क्रियता व गैरव्यवहारांची प्रकरणेच उघडी पाडली जातील, असे स्पष्ट केले. नुकतेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजप विधिमंडळ गटाची बैठक आज पर्वरी येथे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या दालनात झाली. येत्या विधानसभा अधिवेशनाच्या तयारी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या निमित्ताने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मनोहर पर्रीकर यांनी बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यावेळी हजर होते. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार षंढ बनले आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ता केवळ पैसा कमवण्याचे साधन म्हणूनच वापरली जात आहे. "पीडीए' ही चरण्याचे कुरण अशीच सरकारची भावना बनली आहे व त्यामुळे उत्तर गोवा "पीडीए'वर कुडतरीचे आमदार, वास्को "पीडीए'वर सांताक्रुझच्या आमदार व मडगाव "पीडीए'वर कुठ्ठाळीच्या आमदारांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा ठपका श्री. पर्रीकर यांनी ठेवला. विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असताना त्यांना मंत्रिपदाची पुन्हा शपथ देण्याचे कारण काय, असा सवाल करून हा निव्वळ निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी खिल्लीही श्री. पर्रीकर यांनी उडवली. बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. युगोडेपाचे नेते ऍड. राधाराव ग्राशिएस व इतर पदाधिकाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे मिळवण्यात येतील व त्यानंतर ही याचिका सभापतीसमोर सादर केली जाईल. सभापती प्रतापसिंह राणे यांच्या भूमिकेबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आत्तापर्यंत एकाही अपात्रता याचिकेवर सभापती राणे यांनी निकाल दिला नाही, यावरून ते पक्षपातीपणे वागत असल्याचे उघड होते. ढवळीकरबंधुंना मतदानापासून वंचित ठेवण्याचा निर्णय त्यांनी लगेच घेतला पण आता त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यास एक वर्ष होऊनही अद्याप निकाल का दिला जात नाही, असा खडा सवालही श्री. पर्रीकर यांनी केला. सभापती राणे यांचा कॉंग्रेसप्रती झुकता कल उघडच आहे; पण निदान नैतिकता म्हणून तरी त्यांनी या याचिका निकालात काढाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.
वाळपईत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार
विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने वाळपई मतदारसंघात येत्या सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजप पूर्ण ताकद वापरेल व वाळपईवासीयांनी आपल्या भवितव्याचा विचार करून व आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन केले जाईल. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात विश्वजित राणे यांचे आरोग्य व कृषी खात्यातील असंख्य गैरव्यवहार व निष्क्रियतेचा पर्दाफाश केला जाणार असून वाळपईवासीयांना एक नवी क्रांती घडवण्याची संधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे, असेही श्री. पर्रीकर म्हणाले.

No comments: