Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 11 May, 2010

मंत्री रमेश यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केंद्राची कोंडी

पंतप्रधानांकडून कडक शब्दांत खरडपट्टी
सरकारात एकवाक्यता नसल्याचे चित्र उघड

बीजिंग, दि. १० : चीनसंबंधी भारताच्या भूमिकेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातच एकवाक्यता नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकार आणि कॉंग्रेस पक्षात विलक्षण अस्वस्थता निर्माण झाली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यासंदर्भात रमेश यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली असून भारतीय जनता पक्षाने तर रमेश यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. साहजिकच शशी थरूर यांच्यानंतर आता रमेश यांचा "नंबर' लागणार काय अशा चर्चेने राजधानी नवी दिल्लीत जोर धरला आहे.
भारत हा चीनबद्दलच्या मानसिक विकृतीने ग्रासलेला आहे आणि उगाचच भीतीचा बागुलबुवा उभा करून तो चीनविरुद्ध वातावरण तापवतो आहे, अशी मुक्ताफळे उधळून मंत्री रमेश यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीजिंग या चीनच्या राजधानीतच सुरू असलेल्या "वातावरणातील बदल' या विषयावरील परिषदेत त्यांनी ही धक्कादायक विधाने केली आहेत. रमेश यांच्या या विधानाची पंतप्रधानांनी गंभीर दखल घेताना अन्य खात्यांबाबत त्यांनी शेरेबाजी बंद करावी, अशी तंबी दिली आहे. याचसंदर्भात भाजपनेही रमेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भारतीय गृह मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाच्या धोरणांविषयी टिप्पणी करताना जयराम रमेश यांनी "पॅरानॉईड' आणि "अलार्मिस्ट' असे शब्द वापरले. केंद्रात सत्ता उपभोगत असलेल्या "संपुआ' सरकारला विलक्षण खजील करणारी विधाने करताना रमेश म्हणाले की, कोपनहेगन परिषदेनंतर शेजारी राष्ट्रांमध्ये सुधारत चाललेल्या संबंधांना भारताचे गृहमंत्रालय सध्या राबवत असलेल्या धोरणांमुळे खीळ बसू शकते. भारताने चीनसंबंधी अधिक खुले धोरण राबवण्याची गरज असून "अनावश्यक निर्बंध' त्वरित हटवावेत, असे ते म्हणाले.
चीनच्या "ह्युवेई' या आस्थापनाकडून आयात करून सीमाप्रदेशात बसवल्या जाणाऱ्या टेलिकॉम उपकरणांवर अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव भारताने निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर रमेश यांनी मतप्रदर्शन करताना भारताच्या धोरणांवरच कोरडे ओढून सरकारला विलक्षण अडचणीत आणले आहे.
फटकळ पर्यावरण मंत्री
दरम्यान, जयराम रमेश आणि वाद यांचे नाते तसे जुनेच आहे. त्यांनी केलेली ही काही पहिलीच वादग्रस्त विधाने नव्हेत. यापूर्वी गेल्या नोव्हेंबरमध्ये पर्यावरणमंत्र्यांनी भारतातील शहरे ही जगातील सर्वांत गलिच्छ असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडले होते. पर्यावरणसंबंधी एका अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात भारतातील पालिकांकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी असलेल्या अपुऱ्या साधनसुविधेवर टीका टिप्पणी करताना त्यावेळी ते म्हणाले होते की, "जर गलिच्छतेसाठी आणि ओंगळपणासाठी नोबेल पारितोषिक असते ते नक्कीच भारताला मिळाले असते'.
यावर्षी एका पदवीदान समारंभात तोंडाचा पट्टा सैल सोडताना त्यांनी अशा समारंभात जो गाऊन परिधान करण्याची परंपरा आहे त्यावर भाष्य करताना, "ही प्रथा म्हणजे तद्दन रानटीपणाचे व वसाहतवादाचे द्योतक आहे', असा शेरा आपले खांदे उडवत मारला होता.
दरम्यान, बेताल वक्तव्ये करून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पेचात पकडण्याचे काम विद्यमान सरकारमधील मंत्री वेळोवेळी करत आलेले आहेत. पर्यावरण मंत्रालयाने बंदी घालूनही केंद्राने महेश्वर धरणाचे काम सुरूच ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर रमेश यांनी तेथील निर्वासितांचे योग्यपणे पुनर्वसन केले गेले नाही, असा आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला होता. हल्लीच रस्ता वाहतूकमंत्री कमलनाथ यांच्याशी असलेले मतभेद मंत्रिमंडळ बैठकीत जाहीरपणे उघड करून रमेश यांनी सरकार यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दाखवून दिले होते. त्यावेळी कमलनाथ यांनी पर्यावरण मंत्री पर्यावरणीय दाखल्यांच्या सबबी पुढे करून महत्त्वाच्या प्रकल्पांना आडकाठी आणत असल्याची टीका केली होती.
रमेश यांनी राजीनामा द्यावा : भाजप
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रमेश यांच्या बेजबाबदार वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही तर भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करेल, असा झणझणीत इशारा भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे. विदेशी भूमीवर राष्ट्रीय धोरणांची खिल्ली उडवण्याचे रमेश यांनी केलेले कृत्य हे विलक्षण अशोभनीय असून त्यास भाजपचा कडक आक्षेप आहे. सरकारमध्ये असलेल्या या बेबनावासंदर्भात पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता असून मंत्र्यांवर त्वरित कारवाई करण्याचीही गरज आहे. भारत आणि चीन यांच्या संबंधांवर मतप्रदर्शन करताना रमेश यांनी "विचित्र खुलासा' केला आहे. चीनच्या हॅकर्सनी भारतीय वेबसाइट्सना लक्ष्य केले आहे हे जगजाहीर आहे आणि त्यामुळेच गृह मंत्रालयाने यासंदर्भात काही विधिनिषेध घालून दिले आहेत. असे असताना रमेश यांनी गृहमंत्रालयाच्या धोरणांवर टीका करावी ही दुर्दैवी बाब असल्याचे भाजपने म्हटले आहे.
पंतप्रधानांकडून खरडपट्टी
आपल्या चीन दौऱ्यादरम्यान गृह आणि संरक्षण मंत्रालयाचे काम चीनबद्दल भेदभावपूर्ण असल्याचे मत व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी रमेश यांची चांगलीच खरडपट्टी काढली असून अशा प्रकारचे वक्तव्य न करण्याचे आणि दुसऱ्या मंत्रालयांच्या कामात हस्तक्षेप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विदेशी भूमीवर आपल्याच सरकारबद्दल ढिसाळ वक्तव्य केल्याबद्दल भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी जयराम यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनीही जयराम यांना फोन करून त्यांची खरडपट्टी काढली आहे.

No comments: