Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 12 May, 2010

पोरस्कडे अपघातात पितापुत्राचा दुर्दैवी अंत

पेडणे, दि. ११ (प्रतिनिधी): पोरस्कडे - पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी २.३० वाजता बस व स्कूटर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तुये - कातोडी येथील तुकाराम पाडलोस्कर (३६) व त्यांचा चार वर्षीय पुत्र तृप्तेश पाडलोस्कर यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे संपूर्ण पेडणे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. ११) दुपारी २.३० वाजता तुकाराम पाडलोस्कर आपल्या चार वर्षीय तृप्तेश या मुलासोबत व्हेस्पा स्कूटर क्र. जीए - ०१ - एल - ४२४६ या वाहनाने पेडणेमार्गे पत्रादेवीला जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने नीता ट्रॅव्हल्सची एमएच ०२ एक्सए १५१२ या क्रमांकाची बस पुण्याहून पेडण्याच्या दिशेने येत होती. त्यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात स्कूटरवरील पिता - पुत्र रस्त्यावर फेकले गेले आणि बसच्या चाकाखाली आले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून त्याच बसमधून जखमी पितापुत्र यांना त्वरित पेडे - म्हापसा येथील वृंदावन इस्पितळात उपचारांसाठी दाखल केले.
उपचार सुरू असताना तुकाराम पाडलोस्कर यांचे निधन झाले. कु. तृप्तेश याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते; रात्री उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार उपचार घेत असता त्याचाही मृत्यू झाला आहे.
अपघाताचे वृत्त पेडणे पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये व हवालदार लाडजी नाईक यांनी पंचनामा केला व स्कूटर ताब्यात घेतली. बस घटनास्थळाहून निघून गेल्याने ती ताब्यात घेण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे.
------------------------------------------------------
आमचा तुकाराम गेला...
अपघाताचे वृत्त तुये गावात पोहोचताच लोकांनी पाडलोस्कर यांच्या घरी धाव घेतली. "आमचा तुकाराम गेला..' असे सांगताना तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. घरातील दृश्य करुणाजनक दिसत होते. अपघातात मृत झालेले तुकाराम पाडलोस्कर हे तुये औद्योगिक वसाहतीतील पॉवर कंपनीत काम करत होते. सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून गावात परिचित असलेल्या तुकाराम यांचे ५ वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना तृप्तेशव्यतिरिक्त दीड वर्षाची एक मुलगी आहे. ही चिमुरडी आता आपल्या पित्याच्या प्रेमाला कायमची अंतरली आहे. तुकाराम याच्या पत्नीवर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पितापुत्रांच्या निधनाबद्दल गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments: