Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 May, 2010

उत्तर गोव्याचे किनारे बनले अमली पदार्थांचे" माहेरघर'

सभापती राणे यांचा सणसणीत टोला
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): उत्तर गोव्याच्या किनारी भागांत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ व्यवहार फोफावल्याने राज्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर काळवंडली असल्याचा जबरदस्त टोला सभापती प्रतापसिंग राणे यांनी हाणला. इथे सहजपणे अमलीपदार्थ मिळतात व गोवा हे अशा पदार्थांचे नंदनवन असल्याचा आभास निर्माण केला जात असून त्यामुळे पर्यटनाबरोबर राज्याचीही बदनामी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये आज प्रसारमाध्यमांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. विधानसभा अधिवेशन काळात राज्यातील गुन्हेगारीवरील चर्चेवेळी सरकारला कानपिचक्या देणाऱ्या सभापती प्रतापसिंग राणे यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने सरकारला चांगलेच धारेवर धरले.
अमलीपदार्थ व्यवहार प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रग माफिया अटाला याचा प्रदर्शित झालेल्या "व्हिडीओ'त त्यांनी पोलिसांवर केलेली वक्तव्ये धक्कादायकच नव्हे तर पोलिस खात्याच्या विश्वासार्हतेवरच घाला घालणारी ठरली आहेत. पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलेले अमलीपदार्थ खुल्या बाजारात विकले जात असल्याची माहिती त्यांनी उघड करून पोलिस खात्याचे जणू वस्त्रहरणच केले, असा टोलाही सभापती राणे यांनी हाणला.यापुढे छापा टाकून जप्त केलेल्या अमलीपदार्थाचा मालाची वासलात लावताना किमान दोन ते तीन बिगर सरकारी संस्थांची मदत घेण्याचा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिला.
अमलीपदार्थ व्यवहारामुळे राज्याचे पर्यटन बदनाम होत आहे व ते राज्याला अजिबात परवडणारे नाही.अलीकडेच आफ्रिकेतील आपल्या दौऱ्यात काही इस्रायली नागरिकांशी भेट झाली, त्यावेळी त्यांच्या मनात गोव्याबद्दलची ओळख अमलीपदार्थ व्यवहाराशी संबंधित असल्याचे आपणास तीव्रतेने जाणवल्याचे सभापती म्हणाले. या लोकांनी हणजूण व पाळोळे किनाऱ्यांचे नाव घेऊन तिथे अमलीपदार्थ मिळतात,असे जाहीर वक्तव्य करून आपल्याला चाटच केले,असा गौप्यस्फोटही सभापती राणे यांनी केला. अमलीपदार्थ व्यवहारांचे जाळे नष्ट करण्यासाठी कडक कायद्यांची गरज आहे, अशी सूचना त्यांनी केली.

No comments: