Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 May, 2010

म्हापसा 'बाजारपेठ बंद' यशस्वी

म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी): सकाळपासून म्हापशातील व्यापाऱ्यांनी बाजारातील आपली सर्व दुकाने बंद ठेवून म्हापसा व्यापारी संघटनेने आज (दि.१२) पुकारलेल्या "बाजारपेठ बंद'ला पूर्णपणे पाठिंबा दर्शवत हा "बंद' यशस्वी केला.
नगरपालिकेने दामदुप्पट करवाढ व भाडेवाढ मागे घ्यावी आणि मार्केटमधील बसणाऱ्या फुटपाथवरील विक्रेत्यांना हद्दपार करावे. गटार, नाले त्वरित साफ करावेत, घाण कचरा वेळोवेळी वाहून म्हापसा शहर स्वच्छ ठेवावे, पार्किंग समस्या सोडवावी व बाह्य आराखडा त्वरित रद्दबातल करावा, अशा अनेक मागण्यांचे निवेदन म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत गवंडळकर यांनी नगराध्यक्षा रूपा भक्ता यांना दिले. यावेळी मुख्याधिकारी दशरथ रेडकर, अभियंते नाईक, संयुक्त मामलेदार अंजू केरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर, सचिव रामा राऊळ, उदय वेंगुर्लेकर, आरमीम डिसोझा, आशिष शिरोडकर, प्रभाकर येंडे, नगरसेवक आनंद भाईडकर, ऍड. सुभाष नार्वेकर आणि इतर निवेदन देणाऱ्यांमध्ये उपस्थित होते.
आज सकाळी म्हापशाच्या सर्व दुकानदारांनी म्हापसा म्युनिसिपल मार्केटमध्ये जमा होऊन नंतर ११ वाजण्याच्या सुमारास मार्केटमधून गांधी चौकाला वळसा घालून हनुमान मंदिरासमोरून थेट नगरपालिकेकडे मोर्चा वळवला. यावेळी त्यांनी पालिकेत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. त्यांना यावेळी पालिकेच्या दरवाजावर तैनात असलेल्या पोलिसांनी रोखले. यावेळी व्यापाऱ्यांनी पालिकेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
नगराध्यक्षा रूपा भक्ता यांनी व्यापारी संघटनेच्या मुख्य अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी त्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. गवंडळकर यांनी दुकानदारांच्या समस्या त्यांच्यासमोर ठेवल्या. ते म्हणाले की, म्हापसा पालिकेने बाजारकरांवर लादलेल्या बाह्य विकास आराखडा २०११ वर दाखवलेल्या २० मीटर रस्त्याने दुकानदारांची दुर्दशा होणार आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जर आराखड्याप्रमाणे विचार केला तर म्हापसा बाजारातील दुकाने मोडीत काढली जातील याचा विचार नगरपालिकेने का केला नाही, असा सवाल त्यांनी केला व सदर बाह्य विकास आराखडा ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी केली.
त्याचप्रमाणे, शहरातील पार्किंगच्या समस्यांचा विचार नगरपालिका आणि पोलिसही करीत नाहीत. पोलिस आणि पालिका मिळून दुचाकी वाहने उचलून नेण्याची कारवाई करत आहेत. ते थांबवून वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करा आणि मगच वाहने उचला, असे व्यापारी संघटनेने नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. बाजारकरांच्या हितासाठी जे निर्णय पालिका घेईल, त्यात सर्वप्रथम म्हापसा व्यापारी संघटनेला विश्वासात घ्या, अशी मागणीही केली गेली.
यावेळी नगराध्यक्षांनी या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व भाडेवाढीवर येत्या सोमवारी नगरसेवकांची बैठक बोलावून व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, जोपर्यंत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरू असा निर्वाणीचा इशारा नगराध्यक्षांना जमलेल्या व्यापाऱ्यांनी दिला.
नागरिकांचो एकवट, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, मासळी विक्रेत्यांची संघटना व म्हापसावासीयांनी हा "बंद' यशस्वी करण्यास मदत केली. मासळी मार्केटमधील बऱ्याच समस्या सोडवण्यात म्हापसा नगरपालिका अयशस्वी ठरली आहे. विक्रेत्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यापारी संघटनेनेही मासळी विक्रेत्या संघटनेला मदत करावी, असे आवाहन मासळी विक्रेत्या संघटनेने यावेळी केले.

No comments: