Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 21 February, 2010

आगामी काळ भाजपच्या वैभवाचा इंदूर अधिवेशनाने दिली नवी उर्जा

प्राचार्य पार्सेकर यांचा विश्वास
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मध्य प्रदेशातील इंदूर येथील एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाने भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये "न भुतो न भविष्यती' असा आत्मविश्वास निर्माण झाला असून या चैतन्यदायी वातावरणामुळे आगामी काळात पक्ष संपूर्ण देशात एक नवी उभारी घेईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज व्यक्त केला.
गोव्यातील पक्षाचे १४ आमदार, एक खासदार व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मिळून ४० जाणांच्या गटाचे सर्व सदस्य आज इंदूरहून गोव्यात परतले. इंदूरमध्ये मिळालेली उर्जा, भावी वाटचालीचा स्पष्ट असा दिशादर्शक नकाशा, योजना, कार्यक्रम आणि येणाऱ्या काळातील उद्दिष्टे इतकी सुस्पष्ट आहेत की, येणारा काळ हा भाजपच्या वाढीचा, वैभवाचा आणि जबरदस्त कार्यक्रमांनिशी सामान्य जनतेचा विश्वास जिंकण्याचा असेल, असे प्राचार्य पार्सेकर म्हणाले.
ते म्हणाले की, इंदूरचे संमेलन हा पक्षाच्या ध्येयधोरणांना गती आणि शक्ती देणारा एक उर्जास्त्रोत होता. पक्षाचे सर्वच्या सर्व लहान मोठे पदाधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते एका पातळीवर येऊन एकदिलाने भावी वाटचालीचा विचार करत आहेत. हा अनुभव इतका अद्भुत होता की, तीन दिवसांनी गोव्यात परतलेले आम्ही एक वेगळा उत्साह घेऊन आलो आहोतच परंतु हा उत्साह संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांना एक नवीन उमेद देईल.
पक्षाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्वतः निवड कशी योग्य होती याचाच प्रत्यय या अधिवेशनात आणून दिला. ज्या आत्मविश्वासाने त्यांनी सूत्रे हाताळली, अधिवेशनाला दिशा दिली, विचार दिला ती त्यांची क्षमता केवळ वादातीत होती. कधी काळी पक्षाच्या तिसऱ्या फळीत समावेश होणारा हा नेता आज पहिल्या फळीत आला तेव्हा त्याच्यातली क्षमता आणि आत्मविश्वास काठोकाठ भरलेला दिसला. अशा तरूण नेत्याच्या हाती पहिल्यांदाच पक्षाच्या सूत्रे आली असल्याने सगळ्याच पातळ्यांवर एक नवसंजीवनी पसरली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षा हे विषय हाताळण्यास केंद्रातील "युपीए' सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून वीस लाख सह्या गोळा करण्याचा निर्धार अधिवेशनात पक्का करण्यात आला. याच विषयांवरून सुमारे पाच लाखांचा विराट मोर्चा संसदेवर नेऊन संसदेला घेराव घातला जाईल. असे अनेक कार्यक्रम अधिवेशनात निश्चित करण्यात आले असून त्याची तितक्याच जोरदारपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
अधिवेशनात पक्षाचे जवळपास एक हजार आमदार - खासदार आणि पदाधिकारी प्रतिनिधी मिळून पाच हजार सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासाठी हजारो तंबूंची सोय करण्यात आली होती. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी असे सगळेच तंबूत राहिले होते. सगळे मजेत आणि आनंदात राहिले. सगळे एकत्रित राहण्याचा तो आनंद वेगळाच होता. एकसंधतेची उर्जाही वेगळी होती, असे सांगून ही उर्जा येणाऱ्या दिवसांत सर्वत्र पाहायला मिळेल असा विश्वास प्राचार्य पार्सेकर यांनी व्यक्त केला.
पहिल्या दिवशीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला स्वतः पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर व महासचिव अविनाश कोळी हे उपस्थित होते. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात गोव्यातून गेलेले चाळीसही जण हजर होते, असेही त्यांनी सांगितले.

No comments: