Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 20 February, 2010

कामत हटाव मोहीम अधिक तीव्र

प्रतापसिंग राणेंच्या पर्यायाला पसंती
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): दिगंबर कामत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यासाठी कंबर कसलेल्या सरकारातील बंडखोर गटाने मुख्यमंत्री हटाव मोहीम आता सर्व पातळ्यांवरून राबवण्याचा चंगच बांधला आहे. मुख्यमंत्री कामत यांना राज्य मंत्रिमंडळात होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याने कामत यांनी दिल्लीतील एका लॉबीचा आश्रय घेण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या गोष्टींचा सुगावा लागलेल्या बंडखोर गटानेही आता थेट दिल्लीतच दबाव वाढविण्याचे निश्चित केल्याने कामत यांची पंचाईत होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सभापती प्रतापसिंग राणे यांच्या नावाला हळहळू सगळ्याच बाजूने होकार मिळू लागल्याने कामत गटाचे धाबे चांगलेच दणाणले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री कामत यांना खरे तर आधीपासूनच मंत्रिमंडळात अनेकांचा विरोध होता. ज्या मार्गाने ते आले आणि इतरांना मागे खेचून मुख्यमंत्रिपदावर स्थानापन्न झाले तेव्हापासून कामत यांच्या विरुद्ध सरकारात असंतोष होता. किमान दोन वेळा तो अत्यंत तीव्र स्वरूपात प्रकट झाल्याने त्यांचे सरकार जवळजवळ पडलेच होते. त्या दोन्ही वेळा नाही म्हटले तरी सभापती प्रतापसिंग राणे यांनी कामत यांना मदत केली होती. परंतु सध्या आमदार, पक्षजन, युतीचे घटक आणि जनताच नव्हे तर खुद्द सभापतीच या सरकारच्या बेबंदशाहीला इतके कंटाळले आहेत की, कामत यांनी पूर्वीची ती सहानुभूतीही घालवली आहे. श्रीयुत राणे हे अनेक वर्षे गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र जेव्हा जेव्हा राज्याच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा त्यांनी कोणतीही तडजोड केली नव्हती. आज कामत सरकार हे केवळ तडजोडीचे आणि मिळेल ती संधी पदरात पाडून घेणारे सरकार ठरले असल्याने राज्यात केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक स्तरावरही ठिकठिकाणी प्रचंड असंतोष दिसू लागला आहे. यात खाणी सारख्या विषयामुळे तर कामत सरकार पुरते बदनाम झाले आहे. या क्षेत्रात घुसलेले दोन चार मंत्री वगळता कोणालाच या सरकारबद्दल सहानुभूती उरलेली नाही. परिणामी कामत हटाव मोहिमेला सर्व आघाड्यांवरून पाठिंबाच मिळत आहे.
गोव्यात सुरू असलेल्या विरोधी मोहिमेमुळे त्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांना आपल्या बाजूने "मॅनेज' केले असले तरी विरोधी मोहिमेत सक्रिय असलेले आमदार, मंत्र्यांना पाणी नेमके कोठे मुरते आहे याची अचूक कल्पना आल्याने त्याला मात देण्यासाठी त्यांनीही आपले डावपेच तीव्र केले आहेत. अशावेळी प्रतापसिंग राणे यांच्या नावाला सहमती मिळवण्यात हा गट यशस्वी झाला असून कॉंग्रेस, राट्रवादी आणि म. गो. असे मिळून किमान पंधरा ते सतरा जणांचा गट आज राणेंचे नेतृत्व मानण्यास तयार झाला आहे. अशावेळी काही ठरावीक माध्यमांतून बातम्या पसरवून दिगंबर कामत हे कसे सक्षम आहेत आणि त्यांना पाठिंबा किती भक्कम आहे हे पटवून देण्याचा लंगडा प्रयत्न त्यांच्या निकटवर्तीयांनी चालविल्याचे सध्या दिसत आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे व कामत यांचे आसन चांगलेच डळमळीत झाल्याचे खुद्द कॉंग्रेस वर्तुळातील मान्यवरांचे म्हणणे आहे. अशा वेळी दबाव वाढत गेला तर नेतृत्व बदलाला पर्याय राहणार नाही, किंबहुना राणे हा पर्याय म्हणून पुढे आल्यास हा पर्याय ठोकरणे कॉंग्रेस श्रेष्ठींनाही शक्य होणार नसल्याचे सध्या राजकीय वर्तुळात मानले जाते.
मुख्यमंत्री कामत नुकतेच दिल्लीहून परतले आहेत व केंद्रीय मंत्री जतीन प्रसाद यांच्या लग्न समारंभासाठी आपण गेलो होतो असे कारण त्यांनी पुढे केले आहे. प्रत्यक्षात मात्र आपले आसन वाचवणे हाच सध्या एककलमी कार्यक्रम बनवलेल्या कामत यांच्या दिल्ली भेटीमागील खरे कारण कोणते हे त्यांचे अवघेच समर्थक आणि मोठ्या संख्येने असलेले विरोधक जाणून आहेत. अशावेळी कामत हटाव मोहीम तीव्र होऊन त्याचे जोरदार पडसाद गोव्याच्या राजकीय क्षेत्रात उमटणे शक्य आहे.

No comments: