Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 February, 2010

तपोभूमीवर 'जन्माष्टमी महोत्सव' थाटात

फोंडा, दि.२२ (प्रतिनिधी): प.पू. श्री पद्मनाथ शिष्य संप्रदाय, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाचे विद्यमान पीठाधीश्र्वर प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांचा "जन्माष्टमी महोत्सव' श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ कुंडई येथे आज(दि.२२) विविध कार्यक्रमासह थाटात साजरा करण्यात आला.
यानिमित्त सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले तर संध्याकाळच्या सत्रात प्रकट कार्यक्रम झाला. यात गोव्यातील सुमारे १६० देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रतिमा देऊन प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या वेळी सौ. ब्राह्मी देवी, सत्कारमूर्ती हिंदूधर्म आचार्य सभा राजकोटचे महासचिव प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी, नाशिक येथील गुरुगंगेश्वरानंद वेदविद्यालयाचे संचालक किसनलालजी सारडा, पुरातन देवस्थान संशोधक रोहित फळगावकर, "गोवा ३६५' वृत्तवाहिनीचे संचालक सुहान कारकल, दोडामार्ग येथील प्रमोद महादेव गावस (जवान) उपस्थित होते.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, तपोभूमीचे आचार्य नवराज भट्ट, प्रसाद द्विवेदी, राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, संप्रदाय समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री पद्मनाथ शिष्य संप्रदाय धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून यापुढे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा पदार्पण करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, असे समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी सांगितले. गोव्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पद्मनाथ शिष्य संप्रदायाच्या कार्याचे स्तुती केली. आजच्या कलियुगात सुद्धा गुरुभक्तीची परंपरा अखंड सुरू ठेवण्याचे काम पद्मनाथ शिष्य संप्रदाय करीत आहे. संस्कृती, संस्कृत, अध्यात्म, वेदाभ्यास या क्षेत्रातील संप्रदायांच्या कार्यामुळे संस्कृतीच्या रक्षणासाठी निश्चित हातभार लागेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी, किसनलालजी सारडा, रोहित फळगावकर, सुहान कारकल, प्रमोद महादेव गावस यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
प्रकट कार्यक्रमाची सुरुवात सांप्रदायिक प्रार्थनेने झाली. सौ. व श्री. राजेंद्र वासू नाईक यांनी स्वामींची पाद्यपूजा केली. तपोभूमीचे बटू प्रवीण व इतरांनी विष्णू स्तुती सादर केली. गुरुदास शिरोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सच्चिदानंद नाईक यांनी केले. स्वामींच्या जन्माष्टमी महोत्सवानिमित्त तपोभूमीच्या परिसरात वातावरण चैतन्यमय बनले होते. भाविक, भक्तगणांची तपोभूमीवर रीघ लागली होती. तपोभूमीत आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली होती. गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तपोभूमीवर जाऊन स्वामींचे अभीष्टचिंतन केले.

No comments: