Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 February, 2010

महागाईच्या मुद्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ

विरोधक आक्रमक कामकाज तहकूब
नवी दिल्ली, दि. २३ : दिवसेंदिवस महागाई भडकतच असून त्यात जनता पोळून निघत आहे. महागाईच्या मुद्यावरून आज अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत विरोधक अतिशय आक्रमक झाल्यामुळे प्रचंड गदारोळ उडाला. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करावे लागले.
महागाईच्या मुद्यावर कोणत्या नियमाअंतर्गत चर्चा व्हावी यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने अंदाजपत्रकीय अधिवेशनाचा आजचा दिवस गोंधळाने गाजला. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज प्रारंभी एक वेळा स्थगित करण्यात आले. दुसऱ्यांदा दोन्ही सभागृहांचे कामकाज पुकारण्यात आल्यानंतर तेव्हाही गोंधळ कमी होण्याऐवजी वाढलेला पाहून दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष व सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या काही पक्षांनी मतविभाजनाअंतर्गत चर्चा व्हावी, अशी मागणी केली. परंतु ही मागणी सरकारने फेटाळून लावली. मागणी फेटाळून लावण्यात आल्याने विरोधक संतप्त झाले. या गोंधळातच सभागृहाच्या पटलावर काही आवश्यक कामकाजाची कागदपत्रे मांडण्याशिवाय कोणतेही कामकाज झाले नाही.
आज सकाळी लोकसभेच्या कामकाजास प्रारंभ झाल्यानंतर औपचारिक कार्यवाही झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित करत यावर स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा व्हावी अशी मागणी केली. महागाईच्या मुद्यावर याआधीही विविध नियमाअंतर्गत चर्चा झालेली आहे, परंतु सरकारने या विषयावर गांभीर्य दाखविलेले नाही. सबब आता आम्हाला या विषयावर कामकाज स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा हवी आहे, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले.
समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनीही सुषमा स्वराज यांच्या म्हणण्याला दुजोरा देत सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. यावर संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बंसल यांनी म्हटले की, महागाईच्या मुद्यावर गेल्या सहा वर्षांत संसदेत चर्चा होत आली आहे, हे खुद्द विरोधी पक्षाच्या नेत्यांनीच मान्य केले आहे. हा काही नवीन विषय नाही, त्यामुळे कामकाज स्थगितीअंतर्गत या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, असे बंसल यांनी म्हटले. नियम-५८(२) व ५८(३)नुसारच ताज्या विषयांवर कामकाज स्थगिती अंतर्गत चर्चा होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संसदीय कामकाज मंत्र्यांनी असे उत्तर देताच सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या पक्षांसह संपूर्ण विरोधी पक्षाचे सदस्य लोकसभा सभापतींच्या आसनासमोर एकत्र झाले व घोषणा देऊ लागले. वारंवार सांगूनही सदस्य आपल्या स्थानी जात नाही तसेच शांत होत नाहीत, असे पाहून सभापती मीराकुमार यांनी सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केले.
१२ वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री बंसल म्हणाले, महागाई असा मुद्दा आहे की ज्याला केवळ केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारेही जबाबदार आहेत. जे विषय केवळ केंद्र सरकारच्याच अधिकारात येतात त्याच विषयांवर कामकाज स्थगिती प्रस्तावाअंतर्गत चर्चा होऊ शकते. त्यामुळे इतर कोणत्या नियमाअंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
बंसल यांच्या उत्तरानंतरही विरोधी बाकांवरील सदस्य संतुष्ट झाले नाहीत ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने गोंधळ जारीच राहिला. अखेर सव्वाबाराच्या सुमारास सभापती मीराकुमार यांनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले.
राज्यसभाही तहकूब
लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही असेच चित्र होते. आज सकाळी ११ वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू होताच महागाईच्या मुद्यावर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी पाच मिनिटे वाट पाहून गोंधळ कमी होत नाही, असे लक्षात आल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. १२ वाजता सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच रालोआ, माकपा, सपा व बसपाच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून मतविभाजनाची तरतूद असलेल्या नियम १६७ अंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा घेतली जावी, अशी मागणी केली, तर सत्ताधारी बाकावरून या मागणीला विरोध करण्यात आला.
आज देशातील जनता महागाईने भरडून निघत आहे, असे सांगून विरोधी पक्षनेते अरुण जेटली पुढे म्हणाले, आज आम्ही अध्यक्षांना दोन नोटिसा दिल्या आहेत. महागाईवरील चर्चेसाठी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यात यावा असे पहिल्या नोटिशीत म्हटले आहे, तर दुसरी नोटीस ही नियम १६७ अंतर्गत महागाईवर चर्चा करण्यासाठीची आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महागाईने आज सर्वच जण त्रस्त आहेत, असे म्हणत माकपा नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले की, नियम १६७ अंतर्गत यावर चर्चा व्हावी. दुपारी बारानंतर राज्यसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच विरोधी बाकांवरील सदस्य उभे झाले व नियम १६७ अंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी अशी मागणी लावली. भाजपचे अनेक सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन १६७ अंतर्गत महागाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी यासाठी मागणी करू लागले.
विरोधकांचा हा गोंधळ सुरू असतानाच उपाध्यक्ष रहमान खान यांनी आवश्यक कागदपत्रे सभागृहाच्या टेबलावर ठेवली. यानंतर त्यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार महागाईच्या मुद्यावर अल्पकालीन चर्चा करण्यास संमती देण्यात आलेली आहे, याकडे रहमान यांनी सदस्यांचे लक्ष वेधले. विरोधी सदस्यांनी दिलेल्या नोटिशीला अनुरूप ही संमती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदस्यांनी गोंधळ न घालता अल्पकालीन चर्चेअंतर्गत हा मुद्दा उपस्थित करावा, असे म्हटले.
याउपरही सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने व कामकाज चालविणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन उपाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी दिवसभरासाठी तहकूब केले.

No comments: