Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 February, 2010

रशियन पर्यटकांच्या दादागिरीचे मोरजी ग्रामसभेत संतप्त पडसाद

पेडणे, दि. २१ (प्रतिनिधी): किनारी भागात वाढलेल्या रशियन पर्यटकांच्या दादागिरीवर आज प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत मोरजी ग्रामसभेत गरमागरम चर्चा झाली. मोरजीत बेकायदा धंदे करणाऱ्या व दादागिरी करणाऱ्या रशियन नागरिकांना थारा देऊ नये असे आवाहन पार्सेकर यांनी यावेळी केले.
रशियन नागरिक कॉस्ता याने स्थानिक टॅक्सीचालक रोहिदास शेटगावकर याला मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. रोहिदास याच्या मृत्यूचे पडसाद आजच्या या ग्रामसभेत उमटले. मृत शेटगावकर यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रा. पार्सेकर यांनी सांगितले.
मोरजीची ग्रामसभा आज सरपंच रत्नाकर शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच धनंजय शेटगावकर, पंच रेखा भिवशेट, हर्षदा पालयेकर, जितेंद्र शेटगावकर, अनंत सावळ, संदीप मोरजे, रितेश नारोजी, पंचायत सचिव अभय सावंत, गटविकास कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून पालयेचे सचिव उमेश शेटगावकर उपस्थित होते.
मरडीवाडा येथील टॅक्सीचालक रोहिदास शेटगावकर कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचा ठराव मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर यांनी मांडला. तो मंजूर करण्यात आला.
आबा शेटगावकर यांनी सूचना करताना सांगितले की स्थानिकांच्या नावावर शॅक्सचा परवाना घेऊन एखादा विदेशी पर्यटक ते चालवत असल्याचे आढळून आल्यास तो त्वरित रद्द करण्याची तरतूद हवी. किंबहुना तशा प्रकारचा नियम घालूनच परवाना देण्याची गरज आहे. रशियन नागरिकांच्या दादागिरीचे अनेक घटना यावेळी नागरिकांनी कथन केल्या. त्यावरून ग्रामसभेचे वातावरण चांगलेच तापले. आमदार पार्सेकर यांनी रशियन नागरिकांचा विषय पुढील महिन्यात विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. किनारी भागात दिसणारे रशियन फलक हटविण्याची मागणीही नागरिकांनी यावेळी केली. रशियन नागरिक चालवत असलेल्या हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालू असतात. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांची दादागिरी वाढल्याची माहितीही अनेकांनी यावेळी दिली. किनाऱ्यावर फिरणाऱ्या अर्धनग्न महिलांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली.
आमदार पार्सेकर यांनी प्रथमच मोरजी ग्रामसभेस उपस्थिती लावली. रोहिदास शेटगावकर यांच्या मृत्यूसंबंधी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. रशियन नागरिक केवळ पर्यटक म्हणून येत नसून त्यांनी आपल्या नावावर जागाही विकत घेतल्याचे पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. एखादी घटना घडल्यास पोलिस वेळेवर पोचत नाहीत. रात्रीच्या गस्ती घालत नाहीत. या भागात तेच तेच पोलिस बदली घेऊन येतात. त्यांचे वरपर्यंत वजन असते. ते पोलिस "थारावणी' करण्यासाठी येतात व विदेशी नागरिकांचे चोचले पुरवितात असा आरोप आमदारांसह नागरिकांनी केला.
प्लॅस्टिक कचऱ्यावरही सभेत गरमागरम चर्चा झाली. गाव प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जनजागृती करण्याचे ठरले. अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. सीआरझेड कायद्याअंतर्गत येणाऱ्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारी पत्रक आल्याची माहिती सचिव अभय सावंत यांनी दिली.

No comments: