Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 February, 2010

...आणि सारा गोवा 'सचिन'मय

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): "और इसी के साथही सचिन तेंदुलकरने वनडे क्रिकेटमें दोहरा शतक लगाया, वो तो सचमुच क्रिकेटका भगवान है,' असे उद्गार समालोचकांच्या तोंडून बाहेर पडताच सारा गोवा एका आगळ्या अनुभूतीने थरारला. पाठोपाठ सुरू झाली ती फटाक्यांची आतषबाजी. अनेकांनी शेजारील हलवायाच्या दुकानांतून मिठाई आणून उपस्थितांचे तोंड गोड केले. जणू स्वतःच द्विशतक झळकावल्याचा आनंद गोव्यातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या चेहऱ्यावर झळकत होता. ग्वाल्हेरमधील रूपसिंग स्टेडियममध्ये सचिनने शतक ठोकले तेव्हा तमाम गोवेकरांनी परस्परांना शुभेच्छा देऊन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानंतर सचिनने द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली व राजधानी पणजीतील रस्ते सुनसान बनले. कधी काळी "रामायण' आणि "महाभारत' या लोकप्रिय मालिकांचे प्रसारण सुरू झाले की, असेच चित्र गोव्यात जागोजागी दिसत असे. त्याची बुधवारी प्रकर्षाने आठवण झाली. पणजीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या प्रत्येक शोरूमला आज जणू रसिकांनी गराडाच घातला होता. एवढेच नव्हे तर सरकारी कार्यालयातील उपस्थितीही नंतर रोडावत गेली. जेथे टीव्ही पाहण्याची सोय आहे तिकडे या मंडळींनी धाव घेतली. आपल्या कामांसाठी आलेल्या गोवेकरांनाही मग राहवले नाही. त्यांनीही या कर्मचाऱ्यांचाच कित्ता गिरवला. "पैरे पै सचिन बरे पेटयता' असे सहजच प्रत्येकजण आपल्या सहकाऱ्याला सांगत होता. सचिनच्या फटकेबाजीचा मनमुराद आस्वाद घेताना रसिकांचे चेहरे क्षणाक्षणाला फुलताना दिसत होते. हर्ष, उल्हास, चैतन्य, उन्मेष, उत्साह अशा भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार झालेल्या रसिकांचे चेहरे "वाचणे' हाही आगळा अनुभव होता. बसमधून प्रवास करणारी मंडळी अरेरे आपल्याला सचिनची खेळी चुकली अशी खंत व्यक्त करताना दिसत होती. त्यांनी मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून दुधाची तहान ताकावर भागवली. दुपारी भारताचा डाव सुरू झाला आणि सलामीवीर वीरेंद्र सेहवाग झटपट बाद झाला. त्यानंतर मात्र सचिनने रूपसिंग स्टेडियमवर मांड ठोकली आणि रसिकांच्या मनावरही. उत्तरोत्तर त्याची खेळी बहरत गेली. त्यामुळे बाजार, दुकाने, विविध आस्थापने, खाजगी आणि सरकारी कार्यालये, एवढेच नव्हे तर इस्पितळांतही सचिन हाच परवलीचा शब्द बनला होता. साहजिकच तमाम गोवेकरांसाठी हा "सचिनपुरस्कृत बंद' जेवढा अद्भुत तेवढाच अविस्मरणीय ठरला..!

No comments: