Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 21 February, 2010

तेलंगण पेटले... विद्यार्थ्यांचा हल्लाबोल

हैदराबाद, दि. २० : स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी आज (शनिवारी) आंध्र प्रदेश विधानसभेवर हल्लाबोल केला. संयुक्त संघर्ष समितीच्या विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे जाणारे सर्व रस्ते रोखले असून शहर प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत.
उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात शनिवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी जमून विधानसभेकडे कूच केले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू तिरुपती राव यांच्या कार्यालयावर दगडफेकही केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने शहरभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र तेलंगण साठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

विधानसभेपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणा-या विद्यानगर परिसरात पोलिसांनी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा अडवला. पण तरीही विद्यार्थ्यांची ' जय तेलंगण ' ची घोषणाबाजी आणि वाद्ये वाजवणे सुरूच होते. पोलिसांना न जुमानता विद्यार्थी पुढे येण्यासाठी प्रयत्न करत होते.

पोलिसांनी ही रॅली बेकायदेशीर असल्याचे सांगत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या आंदोलनाला वेसण घालण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद केले. रेल्वेमार्गावर बॉंब पेरण्यात आल्याच्या अफवा पसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. हैदराबाद-वारंगळ मार्गावरील अनेक ट्रेनही थांबवण्यात आल्या. दक्षिण-मध्य रेल्वेनेही हैदराबाद सिकंदराबाद शहरे जोडणा-या अनेक ट्रेन रद्द केल्या.

No comments: