Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 February, 2010

प्रकाश थळी यांचे निधन

कोट्यवधींचा साहित्यिक
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): प्रसिद्ध गोमंतकीय नाट्यदिग्दर्शक, लेखक, श्रेष्ठ अनुवादक तथा आपल्या अनोख्या "कोट्या'च्या निर्मिती कलेमुळे सर्वत्र "कोट्यधीश' म्हणून परिचित असलेले प्रा. प्रकाश थळी यांचे आज दुपारी अल्प आजाराअंती निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते व त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. चोडण येथे त्यांच्या जन्मस्थळी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजर राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गोमंतकीय साहित्यविश्वात आपल्या अमूल्य योगदानामुळे एक वेगळे स्थान प्राप्त केलेले प्रा. थळी यांचा जन्म १९४५ साली चोडण येथे झाला. लेखक, अनुवादक, कोशकार, संपादक अशा विविध भूमिका त्यांनी वठवल्या. कोकणी, मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांची मक्तेदारी अतुलनीय अशीच होती. विशेष करून कोकणी व मराठी एकांकिका व नाट्यलेखनाद्वारे त्यांनी आपली एक वेगळीच छाप पाडली होती. नाट्यलेखनाबरोबर दिग्दर्शनाची जबाबदारीही तेवढ्याच ताकदीने सांभाळून त्यांनी गोव्यासह महाराष्ट्रातही अनेक पुरस्कार प्राप्त केले. मुंबई येथील पी. डी. लायन्स महाविद्यालय व मडगाव येथील दामोदर वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काही काळ काम केले. गोव्यातील एकमेव कोकणी दैनिक "सुनापरान्त'चे वृत्तसंपादक आणि सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. कोकणी कथांचे इंग्रजीत अनुवाद करून कोकणी साहित्याला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. डॉ. माधवी सरदेसाई व कवी संजीव वेरेकर (व्हिलेज इव्हिनिंग) या पुस्तकांचा त्यात समावेश होतो.
भारतीय संविधानाचा कोकणी भाषेतून अनुवाद करून त्यांनी गोव्याच्या राजभाषेला इतर प्रतिष्ठित भाषांच्या मांदियाळीत बसवले. यू. आर. अनंतमूर्ती यांची "संस्कार' ही कादंबरी त्यांनी कोकणीत अनुवादीत केल्याने त्यांना उत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला. "वासांनी जीव पिसो', "खतखतें', "टेंपोचा प्रवास' हे त्यांचे ललित साहित्य बरेच गाजले. "फुलां आनी फोगोट्यो' (निबंध आणि लेखसंग्रह), वेटींग फॉर घासलेट आणि इतर एकांकिका (मराठी), "पुलिस पुलिस मार पिल्लुक' (नाट्यरूपांतर ), अजिबपुरांतली कल्पकथा (नाट्यरूपांतर ), एक आसलो आबू (नाट्यरूपांतर), सगिना महतो (अनुवादीत नाटक) हयवदन (अनुवादीत नाटक), इंग्रजी - कोकणी शब्दकोश, तियात्राचो इतिहास (संशोधनात्मक पुस्तक), लक्ष्मणराव सरदेसाई (मोनोग्राफ), बाकीबाब बोरकर (मोनोग्राफी), क्रांतीसंगीत (संकलन), बंकीमचंद्र (चरित्र), लक्ष्मणराव सरदेसाई (साहित्य अकादमी, इंग्रजी), भारतरत्न (मान्यवरांची बालचरीत्रे) आदींचा समावेश आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सरोजिनी, पुत्र पृथ्वीराज, कन्या ऍड. आकाश असा परिवार आहे. ऍड. सुहास थळी, राज्यपुरस्कार प्राप्त मधुसुदन थळी, सुरेश थळी, श्रीपाद थळी यांचे ते बंधू होत. नाट्यकलाकार अजित केरकर हे त्यांचे मेहुणे तर आकाशवाणीचे निवेदक मुकेश थळी हे त्यांचे पुतणे होत.
आज संध्याकाळी चोडण येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी विष्णू वाघ, दामोदर मावजो, अमृत कासार, श्रीधर कामत बांबोळकर, प्रेमानंद म्हांबरे, धर्मा चोडणकर, शंभू भाऊ बांदेकर उपस्थित होते.

No comments: