Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 February, 2010

अन्न, वस्त्र, निवारा हरवतो तेव्हा...

वास्को, दि. २५ (पंकज शेट्ये): बुधवारी चिखली येथील एका घरात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे येथील अन्य दोन घरांतील मालमत्ता पूर्णपणे खाक होऊन या घरांत राहणाऱ्या दोन्ही परिवारांचा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे अत्यंत गरिबीतून उभा केलेला संसार चालवत असलेल्या या दोन्ही परिवारांतील १२ सदस्यांवर जणू आभाळ कोसळे आहे. अन्न, वस्त्र आणि उद्ध्वस्त झालेल्या डोईवरील छतासह संसार पुन्हा उभा करण्यासाठी सरकारबरोबरच दात्यांकडूनही साह्यतेची अपेक्षा या पीडितांनी व्यक्त केली आहे.
चिखली येथे भज्यांचा गाडा चालवून खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या मोहन नाईक यांच्या तोंडची चवच पळाली असून सध्या एकवेळचे जेवण कसे करायचे असा मोठा प्रश्न त्यांच्या परिवारापुढे आऽऽऽ वासून उभा राहिला आहे. उत्तरडोंगरी येथे राहणाऱ्या मोहन नाईक यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट एवढा भयानक होता की त्याने शेजारच्या दोन घरांना आपल्या कवेत घेतले. सदर घटनेत मोहन नाईक यांच्या घरातील मालमत्तेबरोबरच बाबू आंबेकर यांच्या घरातील मालमत्ता जळून खाक झाली तर जॉर्ज यांनाही नुकसानी सोसावी लागली. सध्या मोहन व बाबू यांच्या परिवारातील सदस्य उघड्यावर आले आहेत. दोन्ही परिवारातील मिळून १२ सदस्यांना आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे. मोहन नाईक यांच्या परिवारात त्याची बायको, मुले - मुलगी मिळून पाच सदस्य आहेत तर बाबू आंबेकर यांच्या घरात आई - वडील, बायको व तीन बहिणी मिळून सात सदस्य आहेत. मोहन नाईक चिखली येथे भजी, सामोसा आदी खाद्यपदार्थांचा गाडा चालवून महिन्याकाठी सुमारे पाच हजारांची कमाई करून आपली बायको मालिनी, मोठी मुलगी आशा (वय १४), मुलगा सतीश (१३) व महेश (वय १२) याचा पोट भरतात. पण सध्या आपल्या स्वतःच्या परिवाराचे पोट भरणे कठीण झाले आहे. बाबू यांचे वडील मच्छीमार नौकेवर तर त्याच्या दोन बहिणी छोट्या पगाराची नोकरी करून रामरगाडा चालवण्यास हातभार लावतात. त्यांच्या घरची स्थिती काही वेगळी नाही.
आज त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घराला भेट दिली असता आगीच्या विकट खेळाची अनुभूती आली. गरिबीत संसार चालवत दोन वर्षांपूर्वी भाड्याने राहत असलेली ही घरे विकत घेतल्याची माहिती बाबू यांचे वडील लक्ष्मण यांनी यावेळी दिली. स्फोटानंतर जीवनात जणू अंधकार पसरलेला असून सध्या अन्नासाठी पैसे शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा घरे उभारण्यासाठी सुमारे तीन लाख खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन नाईक यांनी आपल्या गाड्यावर सामान आणण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच बॅंकेतून काढून घरात ठेवलेले तीस हजार रुपये, बायको व मुलीसाठी केलेले सुमारे दीड लाखाचे सोन्याचे दागिने तसेच घरातील इतर सामान या आगीत भस्मसात झाले आहे. इतकेच नव्हे तर एकवेळच्या जेवणाचे काय, हा प्रश्न आऽऽऽ वासून उभा राहिला आहे. कालच्या घटनेनंतर वाड्यावरील लोकांनी मोठ्या प्रमाणात मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संसार पुन्हा उभारण्यासाठी कोण मदत करणार, याबद्दल लक्ष्मण व मोहन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दरम्यान, घटनेवेळी परिवारातील कोणताच सदस्य घरात नसल्याने देवानेच एकप्रकारे आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना आता त्यानेच आमचा संसार पुन्हा रुळावर आणण्यास मदत पाठवावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सरकारने या दोन्ही परिवारांना तातडीने मदत करण्याची गरज आहेच, शिवाय सामाजिक कार्यात गुंतलेल्या दात्यांनी सढळहस्ते साह्य करणे तेवढेच आवश्यक आहे, तरच रुळावरून उतरलेली गाडी पुन्हा मार्गी लागणार आणि खवय्यांच्या जिभेवर गरमागरम भज्यांची चव रुळणार.

No comments: