Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 February, 2010

'सासाय-श्रीदामबाब भक्तीसार' चे प्रकाशन

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी): बुयांव थिएटर्स गोंय यांनी तयार केलेल्या "सासाय- श्रीदामबाब भक्तीसार' या श्रीदामोदरावरील कोकणी भक्तिगीतांच्या सीडीचे प्रकाशन आज मडगाव येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या हस्ते झाले.
गोवा वूडलॅंडस हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक, गायक नंदन हेगडे देसाई, श्रीधर कामत, साईश पाणंदीकर, संदेश हेगडे देसाई, यतीन तळावलीकर उपस्थित होते. या सीडीतील गाणी स्वप्निल बांदोडकर व नंदन हेगडे देसाई यांच्या आवाजातील आहेत.
सीडीचे प्रकाशन केल्यानंतर बोलताना आमदार दामू नाईक यांनी गोमंतकीय संस्कृतीवर आधारित ही १२ वी सीडी काढण्याच्या बुयांव थिएटर्सच्या उपक्रमाचे कौतुक केले व गोव्याचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी अशाच प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. भक्ती ही डोळ्यांना दिसत नसते, त्यासाठी ती शब्दबद्ध करून व गाण्यांच्या रूपांतून साकार करण्याचा प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाल्याचे सांगून गोव्याच्या ढासळत चाललेल्या प्रतिमेकडे त्यांनी लक्ष वेधले व अशा वेळी गोव्याची परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न होणे ही मोठी गोष्ट असून विविध देवतांवरील गाणी संग्रहित करून ती सीडीच्या रूपात आणण्याचा प्रयत्न होण्याची गरज त्यांनी प्रतिपादिली.
भाई नायक यांनीही बुयांव यांना शुभेच्छा दिल्या व दामबाबाच्या शिमग्यावरच एक सीडी काढावी व आगामी शिमग्यापूर्वी ती प्रकाशित व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी मठग्रामस्थ हिंदू सभा आवश्यक ती सर्व मदत करेल असेही ते म्हणाले.
प्रथम सीडीचे निर्माते सिद्धनाथ बुयांव यांनी स्वागत केले व या सीडीची कल्पना कशी पुढे आली ते त्यांनी सविस्तरपणे सांगितले. ही सीडी सर्वसामान्यांनाही उपलब्ध व्हावी यासाठी ती माफक दरात (रु. ५०) उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले तर नंदन हेगडे देसाई यांनी आभार मानले. सिद्धनाथ बुयांव यांनी आपल्या "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' या सीडी विक्रीतून मिळालेला रु. ५० हजारांचा नफा आपल्या घोषणेप्रमाणे काणकोण पूरग्रस्त निधीस दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments: